Akola Crime News: अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालूक्यातल्या धामणदरी गावात गुरू-शिष्य परंपरेला काळीमा फासल्याची घटना घडली आहे. जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांकडून चार चिमुकल्या विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करण्यात आले. विद्यार्थींनीनी त्यांच्यावर सातत्याने होत असलेल्या अत्याचाराची पालकांकडे वाच्यता केली. त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली. दोन्ही शिक्षकांवर बार्शिटाकळी पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी शिक्षक राजेश रामभाऊ तायडे आणि सुधाकर रामदास ढगे यांना अटक करण्यात आली आहे. या घटनमुळे जिल्हाभरात संतापाची लाट उसळली आहे.
धामणदरीत 'गुरू-शिष्या'च्या पवित्र नात्याला काळीमा
अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यात धामणदरी गाव आहे. या गावात चौथ्या वर्गापर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेवर दोन शिक्षक आहेत. येथे चौथ्या वर्गात शिकत असलेल्या चार विद्यार्थीनींवर त्यांच्या दोन शिक्षकांकडून लैंगिक अत्याचार केले जात असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. दोन्ही शिक्षक मुलींना एकटे पाहून वर्गातच अश्लिल चाळे करायचे. वारंवार घडणाऱ्या या कृत्यामुळे विद्यार्थीनी भयभीत झाल्या होत्या. त्या शाळेत जायला टाळाटाळ करीत होत्या. भेदरलेल्या मुलींना त्यांच्या पालकांनी विश्वासात घेतलं. पालकांनी त्यांना शाळेत न जाण्याचं कारण विचारलं. त्या चौघींपैकी एकीने वारंवार घडत असलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. सदर प्रकार ऐकल्यानंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यानंतर तातडीने कुटुंबीयांनी बार्शिटाकळी पोलीस स्टेशन गाठलं. बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय सोळंके यांच्यासमोर सर्व घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही शिक्षकांना पोलीस ठाण्यात आणलं. दरम्यान पीडित मुलींच्या तक्रारीनंतर शिक्षक राजेश रामभाऊ तायडे (वय 45), सुधाकर रामदास ढगे (वय 53) दोघेही राहणार अकोला यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता आपल्या चिमुरड्यांना शाळेत पाठवायला भीती वाटत असल्याची प्रतिक्रिया पालकांकडून दिली जात आहे.
त्यांनी घालवलं शाळेचं पावित्र्य
धामणदारी या गावात छोटीशी जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेवर दोन शिक्षक असून दोघे शिक्षक अकोला येथून ये-जा करतात. कुणी विद्यार्थी शाळेवर आले नसल्याचे पाहून हजर असलेल्या विद्यार्थींनीसोबत हे दोघेही अश्लील चाळे करायचे. अश्लील चाळे केल्यानंतर कुणालाही सांगू नको अशी धमकीही देत होते. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुले व मुली मिळून 9 इतकीच पटसंख्या आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी हे दोन सुधाकर ढगे आणि राजेश तायडे हे दोन शिक्षक कार्यरत होते. दोघेही दररोज शाळेमध्ये हजर राहत नव्हते. एका दिवशी एकानं हजर रहायचं, असं दोघांनी ठरवलं होतं. हे दोघेही शिक्षक त्यांच्यासोबत अश्लील चाळे करायचे. आज अखेर त्यांच्या दुष्कृत्याचा भंडाफोड झाला.
लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकांना त्वरित निलंबित करा: मनसेची मागणी
धामणदरी येथील जिल्हा परिषद शाळेतील या दोन्ही शिक्षकांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे. यासंदर्भात अकोला जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, शहराध्यक्ष सौरभ भगत, महिला सेना जिल्हाध्यक्ष प्रशंसा अंभोरे , बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष सचिन पाटील गालट, मनविसेचे सौरभ पाटील फाले, वैभव पाटील कोहर आणि संचित फाले यांनी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. येत्या 24 तासांत शिक्षकाचे निलंबन न झाल्यास आंदोलनाचा इशारा मनसेने दिला आहे.