अकोला : जगातील सर्वात पवित्र नात्यापैकी एक पवित्र नातं म्हणजे 'पती-पत्नी'चं नातं. मात्र, याच नात्याची वीण सैल होत असल्याच्या अनेक घटना समाजात सातत्याने घडत असल्याचं दुर्दैवी चित्रं अलिकडे सातत्याने पहायला मिळते आहे. अशीच या नात्याला काळीमा फासणारी घटना अकोल्यात (Akola Crime News) घडली आहे. अकोल्यात आपल्या मुलाच्या वयाच्या तरूणाच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या महिलेने त्यांच्याकडूनच आपल्या पतीची हत्या (Love Triangle) करविली. यात महिलेच्या मनात पतीविरूद्ध आपल्या 20 वर्षीय मुलाच्या आत्महत्येचा रागही होता.
अकोला शहरालगतच्या उगवा येथील शेतशिवारात काही दिवसांपूर्वी एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्याची हत्या करण्यात झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अकोला शहरातील अकोटफैलचे ठाणेदार चंद्रशेखर कडू यांनी या प्रकरणात अधिक तपास करीत आरोपीस बेड्या ठोकल्यात. मृत पती अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने त्याच्या पत्नीने प्रियकराकरवी पतीचा काटा काढल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
'तिच्या' मनात धुमसत होती बदल्याची आग!
'एबीपी माझा'ला पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 12 ऑक्टोंबर रोजी अकोल्यातील अकोटफैल पोलीस स्टेशन हद्दीतील उगवा गावातील शेतशिवारातल्या एका गवताच्या कुरणात सुमारे 50 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यानं मृतदेहाची ओळख पटवणं कठीण झालं होते. शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णाल्यात पाठवण्यात आला होता. वैद्यकीय अहवालात धक्कादायक बाब समोर आली. मृताच्या डोक्यावर, छातीवर मारहाण केल्याच्या जखमा होत्या. पोलिसांनी 'त्या' दिशेने तपास सुरू केला. परंतु अकोला पोलिसांसमोर मृतदेहाचं ओळख पटवण्याचं एक मोठं आव्हान होतं. अकोटफैल पोलिसांनी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सर्व बेपत्ता प्रकरणाची तपासणी सुरू केली. तपासादरम्यान सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात कृषीनगरातील एक व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल होती. त्यामध्ये पन्नास वर्षीय व्यक्तीच्या अंगावर जांभळे शर्ट, कंबरला पट्टा बांधलेल्या अवस्थेत बेपत्ता असल्याचं नमूद होतं. त्यात मृतदेहाजवळ देखील हेचं साहित्य मिळून आलेलं होतं. नातेवाईकांना ठाण्यात बोलावनं दिलं असून ओळख निष्पन्न झाली. विद्यावान बरीळाम प्रधान असं मृत व्यक्तीचं नाव निष्पन्न झालं.
पती-पत्नीत होता बेबनाव?
विद्यावान प्रधान आणि कंकूला (वय 40) या दोघा पती-पत्नींना एक मुलगा होता. मागील दोन वर्षांपूर्वी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येला तिने आपल्या पतीला जबाबदार धरलं होतं. त्यानंतर दोघांमध्ये सातत्यानं वाद व्हायचे. आणि दोघेही वेगळे-वेगळे राहू लागले. पत्नी शिवणी तर पती कृषीनगरात राहायचे. पत्नी कंकूला ही हॉटेलमध्ये काम करायची. तर पती विद्यावान याला दारुच व्यसन असल्याने तो रिकामाच होता.
मुलाच्या आत्महत्येचा बदला खुनानं घ्यायची खुन्नस ठेवली मनात
मुलाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पतीला संपवण्याचा कट तिने सुरू केला. आपण एकट्यानं काही करू शकणार नाहीये, यासाठी कोणाला तरी हाताशी घेऊ, असं ठरवलं. ज्या ठिकाणी कंकूला काम करायची, तिथूनच जवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये लकी श्रवण तेलंते (वय 24 वर्ष रा. मोठी उमरी, अकोला) हा तरुण काम करायचा. त्यानंतर दोघांमध्ये हळूहळू संवाद वाढू लागला, दोघे बाहेर भेटू लागले, मैत्रीही घट्ट झाली. आणि या मैत्रिणीचे रूपांतर कालांतराने प्रेमात झालं.
'लकी'च्या मदतीनं रचना खुनाचा प्लॅन
बघता बघता लकी कंकूलाच्या प्रेमाच्या प्रचंड वेडा झाला. दोघे एकमेकांची दु:ख हलकं करू लागलेत. काही दिवस उलटले आणि तिने आपल्या मनात साठवून ठेवलेलं दुःख त्याच्यासमोर मांडलं. दुःख ऐकल्यानंतर लकीने तिला भरवसा दिलाय. त्यानंतर इथून पुढे विद्यावानच्या हत्येचा कट रचला गेला. तिच्या पतीची संपूर्ण माहिती लकीनं गोळा करून घेतली आणि कामाला लागलाय.
...अन् लकी झाला विद्यावानचा मित्र
विद्यावानला दारूचे प्रचंड व्यसन होतं. तो नेहमी मुर्तीजापूर रोडवरील बिग सिनेमागृहांसमोर बसायचा. हळूहळू लकीनंही आपला मार्ग येथे वळवला. तोही रोज इथे येऊ लागला, लकी आणि विद्यावानची ओळख झाली. दोघेही सोबत दारु पिऊ लागले. लकीनं त्याचा खर्चही उचलला. अनेकदा टॉकीजमध्ये दोघांनी सोबत अनेक सिनेमे बघितलेत. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. अन यातूनच विद्यावानच्या हत्येचा प्लॅन ठरत गेला...
'त्या' दिवशी त्याने विद्यावानला संपवलं
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील माहिन्यातील 24 सप्टेंबर रोजी दोघेही दारू सोबत घेऊन लक्झरी बसनं ग्राम उगवा येथे गेले. येथल्या एका शेतात दोघे दारू प्यायला बसले. रात्री उशिरापर्यंत लकीनं मनसोक्त दारू पाजून विद्यावान डोक्यावर हातातील लोखंडी कड्यानं वार केले. छातीवर 40 ते 50 वेळा बुक्क्या मारल्यात. त्याच्या गुप्तांगावरही लोखंडी कड्यानं मार केला. यामध्ये जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला अन् लकीनं घटनास्थळावरून पळ काढला. परंतु सुमारे 18 दिवसानंतर विद्यावानचा मृतदेह आढळला आणि संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला.
लकी आणि कंकूला पोलिसांच्या अटकेत
मृतकाच्या नातेवाईकांनी त्याच्या पत्नीवर संशय व्यक्त केला. त्यात विद्यावान ज्या ठिकाणी रोज बसायचा तिथेही पोलिसांनी चौकशी केली असा असता, एका सायकल पंक्चरवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार एका मुलासोबत तो नेहमी राहत असायचा, अस समजलं. या तरुणाची चौकशी केल्यानंतर तरुण हॉटेलमध्ये वेटर असल्याचं समोर आलं, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान लकीनं या संपूर्ण घटनेचा खुलासा केला. त्याच्याच पत्नीच्या म्हटलंप्रमाणे आपण असं कृत्य केल्याची त्यांनं कबुली दिली. सद्यस्थितीत कंकूला आणि लकी दोघे पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेचा संपूर्ण खुलासा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय जगदीश जायभाय, जितेंद्र काटखेडे, संतोष चिंचोळकर, इंगळे असलम शहा यांनी केली आहे.