अकोला :  अकोला शहरात (Akola) एका डॉक्टरनं राहत्या घरातील शौचालयामध्ये स्वतःच्या हातावर आणि गळ्यावर चाकूनं वार करून आत्महत्या केली आहे. ही घटना बुधवारी, 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टराने असे टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 


गजानन सुरेश बुवा उर्फ कुळकर्णी असं आत्महत्या केलेल्या डॉक्टराचं नाव आहे. ते जवाहरनगर परिसरातील चायना गेटजवळ राहत होते. गजानन हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्या आजाराला कंटाळूनच त्यांनी जीवन संपवलं असावं, अशी शक्यता कुटुंबीयांनी वर्तवली आहे. या प्रकरणी सिव्हिल पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. गजानन हे मूळ बीएचएमस डॉक्टर असून समर्थ कोचिंग क्लासेसवर 'नीट'च्या विद्यार्थ्यांना शिकवायचे.


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील जवाहरनगर परिसरातील चायना गेट भागातील एका अपार्टमेंटमध्ये गजानन सुरेश बुवा उर्फ कुळकर्णी हे सहकुटुंब वास्तव्यात होते. गजानन हे मूळ बीएचएमस डॉक्टर असून समर्थ कोचिंग क्लासेसवर 'नीट'च्या विद्यार्थ्यांना शिकवायचे. दरम्यान गजानन हे अगदी प्रेमळ आणि शांत स्वभावाचे होते. काल मंगळवारी कुटुंबियांना कुणालाही न सांगता घरातून रागाच्या भरात निघून गेले. सायंकाळपर्यंत सर्व ठिकाणी त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र, कुटुंबीयांना कुठलाही त्यांचा सुगावा हाती लागला नाही. अखेर कुटुंबियांनी या संदर्भात सिव्हिल लाईन पोलिसांत ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. 


अन् त्यांनी स्वत: ला संपवण्याचा घेतला निर्णय 


24 तासानंतर गजानन कुळकर्णी हे स्वतःहून आज बुधवारी सकाळी साडेदहा वाजता घरी परतलेत. आपण कुठे गेले होते, काय झालंय? असे अनेक प्रश्न कुटुंबियांनी त्यांना विचारले पण त्यावर काही नं बोलता गजानन हे शांतचं बसले होते. गजानन घरी परतल्यानंतर सकाळी पत्नी आणि नवव्या वर्गात शिकणारा मुलगा त्यांच्यासह असे तिघे जण घरात होते. जेवण केल्यानंतर दुपारी तीन वाजताच्या सुमारास ते बाथरूमला जाण्यासाठी शौचलयामध्ये बराच वेळ झाल्यानंतर गजानन हे बाहेर आले नाही, त्यांच्या पत्नीने त्यांना हाक लावली मात्र आतून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. शेजारच्याच्या मदतीने शौचालयाचा दरावाजा तोडण्यात आला. त्यानंतर आतील दृश्य पाहून पत्नीला धक्काच बसला. 


गळा कापून घेऊन केली आत्महत्या  


गजानन हे रक्तबंबाळ अवस्थेत दिसल्यानंतर लागलीच यासंदर्भात सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. ठाणेदारांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेटी दिल्यात. घटनास्थळाचा पंचनामा करून गजानन यांचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी अकोल्याचे शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेसंदर्भात सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार गजानन यांनी स्वतः हातावर आणि गळ्यावर चाकूने वार करून आत्महत्या केल्याचे समजते. वैद्यकीय अहवालानंतर सर्व बाबी स्पष्ट होणार असेही ते म्हणाले.


आजारपणातून आत्महत्या केल्याचा संशय 


गजानन यांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळून आली नाही. ते सतत आजारी होते, त्यामुळे ते नेहमी तणावात राहायचे, अशा प्रकारची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली आहे. तरीही त्यांच्या आत्महत्येच मूळ कारण अद्यापपर्यंत समोर आलं नाही. सिव्हील लाईन पोलीस त्या दिशेनेही तपास करीत आहे.