Akola News अकोला : अकोला (Akola) जिल्ह्यातील पातुर तालुक्यात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि जोराच्या वाऱ्यासह गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय. तर उरलेल्या पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची अखेरची धडपड सुरू आहे. त्यात अकोल्यात तापमानाच्या पाऱ्याने नवे उच्चांक गाठत त्यात आणखी वाढ होताना दिसत आहे. उष्णतेचा वाढता पारा लक्षात घेता अस्मानी संकटातून वाचलेल्या शेतातील पीकांना पाण्याची अत्यंत गरज आहे.


अशातच आपल्या शेतातल्या भुईमुग पिकाला पाणी देण्यासाठी मोटार सुरु करण्यासाठी गेलेल्या एका 52 वर्षीय शिक्षकाला जोराचा शॉक लागलाय. या घटनेत त्यांचा जागीचं मृत्यु झाला आहे. प्रल्हाद पुंडलिक ठाकरे असं या मरण पावलेल्या शिक्षकाचं नाव आहे. आज सकाळच्या सुमारास अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील चोंढी शेतशिवरात ही घटना घडली आहे. या घटनेनं ठाकरे कुटुंबावर मोठं संकट ओढावलं आहे.


विजेचा शॉक लागल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू 


धक्कादायक बाब म्हणजे या परिसरातील शेतकरी आपल्या पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून रात्रीच्या अंधारात जीवाची पर्वा न करता पाणी द्यायला जातात. अनेकदा ही गोष्ट शेतकऱ्यांच्या जीवावरही बेतल्याच्या घटना घडल्या आहेत. अकोल्यातल्या आजचा हा प्रकार असाच काहीसा म्हणता येईल. याप्रकरणी चान्नी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे.


दरम्यान, मृत प्रल्हाद ठाकरे हे मूळ जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. गेल्या काही दिवसांपासून ते सुट्टीवर होते. ठाकरे यांची आई ही महिला शेतकरी असून त्यांनी पातुर तालुक्यातील चोंढी शेतशिवारात असलेल्या एका एकरात भुईमूग पिकाची लागवड केली आहे. दर दोन दिवसांआड़ त्या भुईमूग पिकाला पाणी देण्यासाठी जात असतात. परंतु प्रल्हाद ठाकरे हे घरी असल्याने आई शेतात न पाठवता ते स्वत: शेतात गेले होते. दरम्यान, कॅनॉलद्वारे भुईमूग पिकाला पाणी देण्यासाठी प्रल्हाद हे विद्युत बोर्डाजवळ गेले आणि पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी विद्युत बोर्डची पाहणी करत असताना अचानक त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला अन् त्यांना जोरदार विजेचा शॉक लागला. यात त्यांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. अशी प्राथमिक माहिती चान्नी पोलीस स्टेशन पीएसआय कोहळे यांनी दिलीय. 


दरम्यान, ठाकरे कुटुंबातील प्रमुख कर्ता व्यक्ती प्रल्हाद गेल्याने अख्ख कुटुंबावर मोठं संकट उभं झालंय. कारण ठाकरे यांच्या घरातील प्रमुख व्यक्तीला गमावावे लागले आहे. आता प्रल्हाद यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली असं कुटुंब आहे.


इतर महत्वाच्या बातम्या