Maharashtra Akola News: अकोल्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांच्या नावावर कृषी विभागाच्या कथित पथकाने धाडी टाकल्या होत्या. या पथकात अधिकार नसलेल्या अनेक खाजगी व्यक्तींचा समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे आता अकोल्यातील वादग्रस्त धाडी प्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कृषी विभागाच्या कथित धाडीतील दीपक गवळी हा आपला स्वीय सहाय्यक नसल्याची प्रतिक्रिया अब्दुल सत्तारांनी दिली आहे. मात्र, सत्तारांच्या शासकीय दौऱ्यातील पत्रात गवळींचा 'स्वीय सहायक' असा उल्लेख आहे. हे पत्र 'एबीपी माझा'च्या हाती लागलं आहे. 


अकोल्यातील कृषी विभागाच्या कथित पथकानं टाकलेल्या वादग्रस्त धाडीत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. पथकात असलेला दीपक गवळी हा आपला स्वीय सहाय्यक नसल्याची प्रतिक्रिया सत्तारांनी 10 जूनला अकोल्यात दिली होती. मात्र, 21 मे रोजीच्या त्यांच्या छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय दौऱ्यात गवळीचा उल्लेख 'स्वीय सहायक' असाच आहे. त्यामुळे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणालेत ते खरं की त्यांचं पत्र खरं, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.




पाहा व्हिडीओ : Abdul Sattar PA Gavali Case : अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ होणार, गवळी पीए नसल्याची माहिती, पण...



अकोल्यातील वादग्रस्त धाडींचं प्रकरण नेमकं काय? 


अकोल्यातील एमआयडीसीमध्ये या पथकानं धाडी टाकल्या होत्या. या पथकात कृषीमंत्री अब्दूल सत्तारांचा स्विय सहायक दिपक गवळी देखील असल्याचं उघड झालं आहे. अशातच या पथकानं पैशाची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका खत कंपनीच्या व्यवस्थापकानं केला आहे. दरम्यान, यावरून आता ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अब्दुल सत्तारांवर निशाणा साधला आहे. 


अकोल्यात कृषीमंत्र्यांच्या नावावर कृषी विभागाच्या कथित पथकानं अकोल्यातील एमआयडीसीमध्ये धाडी टाकल्या आहेत. मात्र, या पथकात अधिकार नसलेल्या अनेक खाजगी व्यक्तींचा समावेश असल्याची बाब समोर आली आहे. हे संपूर्ण पथक आणि पथकाची धाड एबीपी माझा'च्या कॅमेऱ्यात टिपली गेली आहे. दरम्यान,  अकोल्यातील कृषीमंत्र्यांच्या कथित पथकाविरोधात खंडणीची तक्रार करणाऱ्या अक्षत फर्टीलायझर्सविरोधात कृषी विभागानं कारवाई सुरू केली आहे. नंदूरबार जिल्ह्यातील शहादा येथील कंपनीच्या उत्पादनांची विक्री थांबवली आहे. या कंपनीचा माल असलेल्या गोदामाला सील लावल्याची माहिती मिळत आहे. 


धाडींबाबत कृषीमंत्री काय म्हणाले होते? 


अकोल्यातील कृषी विभागाच्या कथित धाडीवर अखेर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मौन सोडलं होतं. धाडीत काहीच चुकीचं झालं नाही. मतदारसंघातील माझे सहकारी मला सांगूनच हजर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. अकोल्यातून मोठ्या तक्रारी आल्यानंच कारवाई केल्याचं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे.