मुंबई : शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी अजान पठण स्पर्धेचं आयोजन केलं आहे. एका ऑनलाईल चॅनलला दिलेल्या मुलाखतील त्यांनी या स्पर्धेची घोषणा केली आहे. अजान मुळे मन:शांती मिळते. त्यामुळे अजानची गोडी लहान मुलांना लागवी यासाठी या स्पर्धेचं आयोजन केल्याचं पांडुरंग सपकाळ यांनी सांगितलं आहे. ज्याप्रमाणे महाआरती होते तशीच अजान अदा केली जाते. अजानला विरोध करण्याचा प्रश्नच नाही असंही त्यांनी म्हटलं.
शिवसेनेच्या या भूमिकेवर भाजपने टीका केली आहे. राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सत्तेसाठी शिवसेनेचं स्वरुप बदलत असल्याची टीका केली आहे. शिवसेनेचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांच विधान हे शिवसेनेचं सत्तेनंतरचं बदलतं स्वरूप स्पष्ट करणारं विधान आहे. यात कहर म्हणजे वंदनीय बाळासाहेबांचा दाखला त्यात देण्यात आला आहे. यांनी सत्ता टिकवण्यासाठी शिवसेनेच्या मूळ आचारविचाराला तिलांजली देणारी वाटचाल सुरु केली आहे, असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं.
बाळासाहेब प्रत्येक धर्म प्यारा बोलले असतील परंतु त्यांची पालखी उचला असं ते कधी बोलले नाहीत. त्यांनी नेहमी त्यांच्या आचार विचारावर टीका केली. सत्तेच्या नादात मानवतेचा उल्लेख करून हिंदुत्वाची भूमिका सरमिसळ झाल्याचे पांडुरंग सकपाळ यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते. मातोश्रीत नमाज पढल्याचा उल्लेख हे मोठं विधान आहे, असं प्रविण दरेकर म्हणाले. पांडुरंग सकपाळ हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत आणि म्हणून संजय राऊत यांनी सत्ता टिकवण्यासाठी आज शिवसेनेच्या मूळ आचार विचाराला तसेच नेतृत्वाला तिलांजली देणारी वाटचाल सुरु आहे हे याचंच द्योतक आहे, अशी टीका दरेकरांनी केली.