अहमदनगर : आज 20 मार्च... 'जागतिक चिमणी दिवस'... (World Sparrow Day) जगभरात चिमणी संवर्धनासाठी जागर करणारा दिवस. कधीकाळी आपल्या चिवचिवाटानं माणसाचं भावविश्व समृद्ध करणारी चिऊताई आज कुठे जास्त दिसत नाहीये. त्यामुळे गेल्या दशकभरात चिमणी संवर्धनासाठी जगभरात जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत. 'एक मूठ धान्य- एक ओंजळ पाणी' हे अभियान राबवण्याचे आवाहन अहमदनगर जिल्हा निसर्गप्रेमी आणि जैवविविधता संशोधन आणि संवर्धन समुहाच्यावतीने करण्यात आले आहे.


अहमदनगरच्या भिंगार येथील पक्षीप्रेमी जयराम सातपुते हे मागील तीन वर्षांपासून पक्षी संवर्धनाचे काम करत आहेत, त्यांनी कृत्रिम घरटे बनवून तसेच दहा हजारांहून अधिक मातीच्या पसरट भांड्याचेही वाटप करून  जिल्हाभर पक्षी संवर्धनाचे काम केले आहे. दरवर्षी चिमण्यांची संख्या घटत असून मागील आठ वर्षात चिमण्यांच्या संख्येत सरासरी 10 टक्के घट झाली आहे. अहमदनगर जिल्हा निसर्गप्रेमी आणि जैवविविधता संशोधन आणि संवर्धन समुहाच्या पक्षी गणनेतून ही बाब समोर आलीये. 


चिमणी हा केवळ मानवी सहवासात राहू शकणारा पक्षी आहे. गेल्या पाच वर्षापासून जिल्हाभरात चिमणी संवर्धन उपक्रम हाती घेतला आहे. चिमणी वाचवण्यासाठी सातपुते यांच्याकडून दरवर्षी अल्पदरामध्ये शेकडो कृत्रिम घरटे आणि बर्ड फिडर पुरवले जातात.  निसर्गप्रेमी नागरिक असे बर्ड फिडर आपल्या अंगणात, बागेत किंवा परिसरात बसून चिमणी संवर्धनास हातभार लावतात.


आठ वर्षातील चिमण्यांचे प्रमाण


अहमदनगर  जिल्ह्यात मागील आठ वर्षातील चिमण्यांचे प्रमाण जर पाहिलं तर 2015 मध्ये टक्केवारी ही 33.73 टक्के होती. 2016 मध्ये 32.99 टक्के, 2017 मध्ये 26.5 पाच टक्के 2018 मध्ये 22.13 टक्के, 2019 मध्ये 21.12 टक्के 2021 मध्ये 22.5 टक्के,  2022 मध्ये 23.5 टक्के तर आता 2023 मध्ये पक्षीगणनेमध्ये 25 टक्के चिमण्यांची संख्या पाहायला मिळत आहे.


चिमण्यांना वाचविण्यासाठी हे करूयात 



  • उन्हाचा दाह वाढल्याने या पक्षांच्या पाण्याच्या सोयीसाठी घरात किंवा अंगणात पाण्याची व्यवस्था करावी. त्यासाठी एखादे मातीचे भांडे पक्ष्यांना पाणी पिणे पिणे शक्य होईल अशा ठिकाणी ठेवावे.

  • या पक्षांसाठी कमीत कमी दहा फुट उंचीवर लाकडाचे किंवा कपट्याचे कृत्रिम घरटे तयार करावे.

  •  पक्षांना लागणारे धान्य दररोज त्यांना उपलब्ध होईल  अशा पद्धतीने टाकणे. उरलेले अन्न पक्षांना टाकणे.


पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गातील प्रत्येक घटकाला जपणे महत्वाचे आहे. आपलं जगणं आणि पुढच्या पिढीचं बालपण रम्य करण्यासाठी चिऊताई नक्कीच हवी. आपल्या किलबिलाटानं आयुष्याचं भावविश्व समृद्ध करणाऱ्या चिऊताईचं अस्तित्व अन् वैभव जपणं म्हणूनच गरजेचं आहे. नाही तर उद्याच्या पिढीला पुस्तकातून 'एक होती चिऊताई' असे म्हणण्याची वेळ आपल्यावर येऊ नये इतकंच...