अहमदनगर: एकीकडे राज्यात अवकाळी पाऊस पडतोय तर दुसरीकडे काही भागात पाणी टंचाई जाणवत आहे. या पाणी टंचाईमुळे (Water Scarcity) अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात सध्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासोबतच चाऱ्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. 

Continues below advertisement

अहमदनगर जिल्ह्यात शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी दूध व्यवसाय करतात. जिल्ह्याचा विचार केला तर सध्या जिल्ह्यात 13 लाख 16 हजार मोठी जनावरे आहेत. 2 लाख 83 हजार लहान जनावरे आहेत तर 14 लाख 79 हजार शेळी मेंढीची संख्या आहे. मागील पावसाळ्यात म्हणावा तसा पाऊस न झाल्याने नगर दक्षिण च्या अनेक तालुक्यात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न देखील शेतकऱ्यांना सतावत आहे. सध्या अहमदनगर जिल्ह्यात 33 लाख 30 हजार मेट्रिक टन हिरवा चारा शिल्लक आहे. तर 10 लाख 32 हजार मेट्रिक टन कोरडा चारा शिल्लक आहे. हा चारा केवळ दीड महिना पुरेल एवढाच आहे. 

शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखाने तीन एकरवरील ऊस चाऱ्यासाठी मोफत दिला

दक्षिण नगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील अवर्षणप्रवण तालुके म्हणून ओळखले जातात. या भागात उन्हाळ्यात शेती सिंचनाचा प्रश्न उद्धवतो. परिणामी चारा उत्पादन घटते. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. नगर तालुक्यातही सध्या अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झालीये. हीच गोष्ट लक्षात घेऊन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी आपल्या शेतातील तीन एकर ऊस हा परिसरातील पशुपालकांसाठी मोफत देऊन टाकला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्न उपस्थित करत राजकारण करण्यापेक्षा त्यांना प्रत्यक्ष मदत कशी मिळेल यासाठी आपण तीन एकर ऊस पशुपालकांना मोफत घेऊन जाण्यास सांगितल्याचे संदेश कार्ले सांगतात.

Continues below advertisement

दरम्यान कार्ले यांनी आपल्या शेतातील ऊस मोफत दिल्याने मोठी मदत झाल्याचे महिला पशुपालक सांगतात. चारा उपलब्ध नसल्याने मोठ्या अडचणी येत होत्या त्यातच दुधाला भाव नाही, त्यामुळे कसं करायचे ही चिंता लागली होती. पण कार्ले यांच्यामुळे जनावरांना चारा मिळाल्याने महिला पशुपालक द्वारका कोतकर यांनी कार्ले यांचे आभार मानलेत. सध्या नगर जिल्ह्यात काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने चारा टंचाई निवारणासाठी त्याची मदत होऊ शकते. मात्र, दीड महिना पुरेल एवढाच चारा शिल्लक असल्याने मोठ्या प्रमाणावर पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याची चिंता लागून राहिली आहे.

नगरमध्ये 5 दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी

नगर जिल्ह्यात सध्या भीषण पाणीटंचाई असून नागरिकांवर पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात पाच-सहा दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याच्या टँकर्सवर अवलंबून राहावे लागत आहे. नगरमध्ये सर्वाधिक 99 पिण्याचे टँकर हे पाथर्डी तालुक्यात सुरु करण्यात आले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील 291 गावांत आणि 1544 वाड्या वास्त्यावरील 5 लाख 70 हजार लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

आणखी वाचा

पाच दिवसांतून एकदा मिळतंय पिण्याचं पाणी, नगर जिल्ह्याची मदार 312 पाण्याच्या टँकर्सवर, परिस्थिती बिकट