UPSC 2022 Results: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC 2022 Results) परीक्षेत  निकाल जाहीर झाले. महाराष्ट्रातील उमेदवारांनीही यूपीएससी परीक्षेत जोरदार कामगिरी केली आहे. संगमनेरच्या मंगेश खिलारीनं देशात 396 वा क्रमांक मिळवला आहे. मंगेशने कष्टातून हे यश मिळवलं आहे. त्याची आई विडी कामगार आहे तर वडील संगमनेरमध्ये चहाचा स्टॉल चालवतात. मंगेशच्या यूपीएसी परीक्षेतील यशाबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय


मंगेशच्या  वडिलांचा चहाचा छोटा स्टॉल आणि आई विडी कामगार आहे. अतिशय खडतर परिस्थितीत मोठ्या कष्टाने मंगेशने हे यश मिळवले आहे. छोट्या गावातील सर्वसामान्या कुटुंबातील मुलाने UPSC परीक्षेत यश मिळवत ग्रामीण भागातील मुले मागे नसल्याचं दाखवून दिले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी या ग्रामीण भागातील मंगेश खिलारीने UPSC परीक्षेत 396 वा क्रमांक मिळवत आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आहे.


पेढे वाटून आनंद साजरा


संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी हे साडे पाच हजार लोकवस्ती असलेले गाव आहे.  या गावतील पाराजी खिलारी हे गावात छोटसा चहाचा स्टॉल चालवतात तर संगीता या अनेक वर्षापासून विड्या बनवून कुटुंबाला हातभार लावताय. घरची परिस्थिती बेताची असतानाही मंगेश खिलारी या 23 वर्षीय मुलाने UPSC परिक्षेत यश संपादन करत आई वडिलांचा विश्वास सार्थ ठरवला आहे. देशात 396 वा क्रमांक मिळवत मंगेश पास झाला आहे. यामुळे कुटुंबीय आणि मित्रांनी फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून आनंद साजरा केला.  गेली अनेक वर्ष कष्ट करत आहे मात्र आज मुलाचं यश पाहून अत्यानंद झाला असल्याची प्रतिक्रिया देताना आईच्या अश्रूंचा बांध फुटला. 


सुकेवाडीमध्ये पहिल्यांदाच येणार लालदिवा


 मंगेशने सुरुवातीपासून UPSC करण्याचा ध्यास घेतला होता. बारावी विज्ञान शाखेत चांगले गुण मिळून त्याने कला शाखा निवडण्याचा घेतलेला निर्णय बरोबर होता हे सिद्ध झाल्याची प्रतिक्रिया मंगेशच्या मित्राने दिली. तर आर्थिक अडचण असताना त्यातच स्वत:च्या गरजा पूर्ण करत भावाने यश मिळवल्याची  प्रतिक्रिया भावाने दिली आहे. आर्थिक परीस्थीती कशीही असली तरी मुलांच्या स्वप्नांना बळ देण्याचं काम आई वडिल करत असतात. आज मंगेशने यशाचा मोठा टप्पा गाठल्याने आई वडीलांचं स्वप्न पूर्ण झालंय मंगेशच्या यशाने सुकेवाडी सारख्या ग्रामीण भागात प्रथमच लालदिवा येणार आहे.


हे ही वाचा :


सेवानिवृत्त एसटी वाहकाचा मुलगा झाला आयएएस; पहिल्यांदा अपयश पण आई वडिलांना दिलेल्या बळाने यशाच्या शिखरावर