Shirdi Saibaba Sansthan : सध्या महाराष्ट्रातील शिर्डीतील साईबाबा संस्थान चर्चेत आलं आहे. कारण, याबाबत माजी खासदार आणि भाजप नेते सुजय विखे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. या ठिकाणी देण्यात येत असलेल्या मोफत जेवणामुळे राज्यातले सारे भिकारी शिर्डीत जमा झालेत. त्यामुळे गुन्हेगारी लोकांची वाढ होत आहे असं सांगत मोफत जेवण बंद करा अशी मागणी सुजय विखेंनी केली होती. यानंतर त्यांच्यावर विविध स्तरातून टीका देखील झाली होती. दरम्यान, दररोज साईबाबा संस्थानमध्ये किती भाविक जेवण करतात? वर्षभरात किती भाविक भोजन करतात? याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.
वर्षभरात तब्बल 1 कोटी 64 लाख भाविकांनी भोजनाचा लाभ घेतला
साईबाबा संस्थानच्या प्रसादाला या वर्षभरात तब्बल 1 कोटी 64 लाख भाविकांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षीची संख्या तब्बल 10 लाखांनी वाढली आहे. दररोज साधारणतः 25 हजारापर्यंत भाविक प्रसादालयात जेवण करतात. त्यात 3000 भाविक सह शुल्क पास काढून भोजन करतात. तर उर्वरित भाविक मात्र मोफत प्रसादालयात जेवण करतात. मात्र उत्सव काळात आणि सुट्ट्यांच्या कालावधीत ही संख्या 70 हजार ते एक लाखापर्यंत जाते. वर्षभराचा विचार केला तर प्रसादालयात रोज सरासरी 45 हजार भाविक जेवण करतात अशी आकडेवारी समोर येत आहे.
सुजय विखे पाटलांकडून समस्त साईभक्तांचाच अपमान
दरम्यान, याबाबत विविध राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. शिर्डी संस्थानचे वार्षिक उत्पन्न हे 850 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. कालपर्यंत 10 रुपयांना मिळणारे जेवण देणगी वाढल्यामुळं मोफत झालं आहे. यामध्ये विखे पाटलांना पोटशूळ उठण्याचं काहीच कारण नाही. मात्र, सुजय विखे हे सरसकट भिकारी असा शब्दप्रयोग करतात, तेव्हा ते समस्त साईभक्तांचाच अपमान करतात, असे नाही तर आयुष्यभर साईबाबांनी ते तत्वज्ञान सांगितलं आहे, त्याचाही ते अपमान करतात, असे मत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले. संस्थानाने शिक्षणावर खर्च केला पाहिजे असे मत सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलं होते. यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, प्रवरा शिक्षण संस्थेअंतर्गत शिक्षणाचे जे युनिट चालतात, त्या अंतर्गत तुम्ही कोणत्या गरिब आणि गरजू मुलांसाठी मोफत शिक्षण सुरु केले आहे का? आधी स्वत: अंमलात आणा आणि मग इतरांना सांगा असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या: