शिर्डी : साईभक्तांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 20 डिसेंबरला तुम्ही जर शिर्डी (Shirdi News) येथे साईबाबांच्या (Sai Baba Mandir) दर्शनासाठी जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. 20 डिसेंबरला दुपारी पावणे दोन ते साडेचार वाजेपर्यंत समाधी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय साई संस्थानकडून घेण्यात आला आहे.
शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल होत असतात. मात्र, 20 डिसेंबरला साईबाबांच्या मूर्तीचे थ्रीडी स्कॅनिंग होणार आहे. थ्रीडी स्कॅनिंगद्वारे डाटा संग्रहित केला जाणार आहे. थ्रीडी स्कॅनिंगसाठी गठित करण्यात आलेली तज्ञांची समिती साई मूर्तीची पाहणी करणार आहे. यामुळे दुपारी पावणे दोन ते साडेचार वाजेपर्यंत समाधी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. याबाबत साईभक्तांनी नोंद घेण्याचे आवाहन साई संस्थानकडून करण्यात आले आहे.
साई समाधी मंदिरात फुलं-हार नेण्यास मिळाली परवानगी
दरम्यान, कोरोना काळात साई मंदिरात फुलं, हार आणि प्रसाद नेण्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही बंदी हटवण्यात आली आहे. आता साईबाबांच्या समाधी मंदिरात फुलं, हार आणि प्रसाद नेण्यास परवानगी मिळाली आहे. भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर, कर्मचारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांच्या हस्ते संस्थान कर्मचारी सोसायटीच्या स्टॉलचे आज उद्घाटन करण्यात आले. भाविकांची फसवणूक होऊ नये, यासाठी नियमावली आणि दर निश्चित करून फुल, हार आणि प्रसादाची विक्री केली जाणार असल्याचं सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे. सुरुवातीला साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी मार्फत हार, फुल तसेच प्रसाद विक्रीस परवानगी देण्यात आली असून मंदिराच्या बाह्य परिसरातील प्रसाद विक्रेत्यांसाठी नियमावली तयार करून फुलं, हार आणि प्रसादास परवानगी देण्याचा विचारधीन असल्याचे सुजय विखे यांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे ग्रामस्थ, फुल-प्रसाद विक्रेते तसेच भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या