शिर्डी : साईदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना आता साईबाबांच्या समाधी मंदिरात फुल, हार आणि प्रसाद नेण्यास परवानगी मिळाली असून भाजपचे माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील आणि संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर, कर्मचारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांच्या हस्ते संस्थान कर्मचारी सोसायटीच्या स्टॉलचं आज उदघाटन करण्यात आलं. कोविड काळात साई मंदिरात फुल, हार आणि प्रसाद नेण्यावर बंदी घालण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही बंदी हटवण्यात आली आहे.


हार-फुलांच्या विक्रीसाठी नियमावली आणि दर निश्चित होणार


भाविकांची फसवणूक होऊ नये, यासाठी नियमावली आणि दर निश्चित करून फुल, हार आणि प्रसादाची विक्री केली जाणार असल्याचं सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय. सुरूवातीला साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी मार्फत हार, फुल तसेच प्रसाद विक्रीस परवानगी देण्यात आली असून मंदिराच्या बाह्य परिसरातील प्रसाद विक्रेत्यांसाठी नियमावली तयार करून फुल, हार आणि प्रसादास परवानगी देण्याचा विचारधीन असल्याचं सुजय विखेंनी सांगितल. या निर्णयामुळे ग्रामस्थ, फुल-प्रसाद विक्रेते तसेच भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून ‌येतंय.


साई संस्थानच्या माध्यमातून होणार फुलांची विक्री


ज्यांचा उदरनिर्वाह आणि परिवार फुल विक्री आणि उत्पादनाच्या माध्यमातून सुरू होता त्यांच्यासाठी हा दिवस महत्त्वाचा असल्याचं सुजय विखेंनी म्हटलं. साईबाबांच्या आशीर्वादाने हे फूल कायम असंच सुरू राहावं, अशी प्रार्थना त्यांनी साईबाबांकडे केली. साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या माध्यमातून या फुलांची विक्री व्हावी, असे निर्देश न्यायालयाने गठित केलेल्या समितीने दिले आहेत.


फूल व्यवसायिकांना आपल्या दुकानात दरपत्रक लावणं बंधनकारक


प्राथमिक स्तरावर फक्त हार-फुल विक्री ही सोसायटीच्या माध्यमातून केली जाणार आहे. हार, फुल, प्रसाद साई मंदिरात व्यवस्थितरित्या सुरू झाल्यानंतर नगरपालिकेच्या माध्यमातून प्रत्येक व्यवसायिकाला आपल्या दुकानात दरपत्रक लावणं बंधनकारक असेल. शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, शिर्डी परिसरातील युवक नागरिकांना रोजगार मिळावा ही शिर्डी ग्रामस्थांची भावना आहे.


अल्प दरात हार, फुल, प्रसादाची विक्री होणार


साई संस्थान सोसायटीने स्टॉल लावले असून अत्यंत अल्प दरात हार, फुल, प्रसादाची विक्री होणार आहे. साई भक्तांची लूट होऊ नये याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. फुलांची विल्हेवाट लावण्याबाबत साई संस्थांनी विविध प्रक्रिया काढलेली आहे. येत्या सात दिवसात एजन्सी फुलांची विल्हेवाट लावण्या बाबत प्रस्ताव सादर करेल आणि न्यायालयाचा फुलांच्या विल्हेवाट बाबत जो संभ्रम होता तो दूर केला जाईल.


हेही वाचा:


Anganewadi Yatra Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडी देवीने कौल दिला, जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात