अहमदनगर: लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईबाबांना भाविक यथाशक्ती दान देत असतात. यात सोने, चांदी तसेच रोख रकमेचे दानही प्राप्त होतय. मात्र आता हेच दान संस्थान आणि शिर्डीतील बँकाची डोकेदुखी ठरतंय. वर्षाकाठी संस्थानला साडेतीन कोटी रुपयांची नाणी प्राप्त होतात आणि ही नाणी स्वीकारण्यास बँका असमर्थतता दर्शवत आहेत.
शिर्डीमध्ये दर्शनाला दररोज हजारो भाविक येतात आणि आपल्या इच्छेनुसार दानही करतात. या दानामध्ये दानपेटीत येणाऱ्या सुट्या नाण्यांचा मोठा समावेश असतो. साईसंस्थानच्या दानपेटीतील नाण्यांमुळे बँका मेटाकुटीला आल्या आहेत. साईबाबांच्या दानपेटीत दर आठवठ्याला सरासरी सात लाख तर वर्षाला साडेतीन कोटी रुपयांची नाणी जमा होतात. मात्र आता ही नाणी स्वीकारणे बॅंकांना अवघड होऊन बसलंय. शिर्डीतील 12 हून अधिक तर नाशिकच्या एका राष्ट्रीयकृत बँकेत साईसंस्थाचे खाते आहे. प्रत्येक बँकेकडे दीड ते दोन कोटींची नाणी आजमितीला पडून असून नाण्यांच्या डोकेदुखीमुळे चार बँकांनी यापुढे संस्थानच्या ठेवी स्वीकारण्यास असमर्थता दाखवली आहे.
दानपेटीत येणाऱ्या नाण्यांमुळे साई संस्थानपुढे तसेच बँकापुढे देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शिर्डी शहराव्यतिरिक्त जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकामध्ये खाते उघडण्याचा विचार संस्थानकडून करण्यात येत असल्याची माहिती आहे. यातून मार्ग निघावा यासाठी थेट भारतीय रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा करणार असल्याचं संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी म्हटलं आहे.
रामनवमीच्या तीन दिवसात चार कोटींचं दान
शिर्डीतील रामनवमी उत्सवाच्या काळात भाविकांनी साईचरणी कोट्यवधींच दान प्राप्त झालं आहे. तीन दिवसात दोन लाखाहून अधिक भाविकांनी साई दर्शन घेतले. रामनवमी उत्सवाच्या तीन दिवसात साईबाबा संस्थानला एकूण चार कोटी नऊ लाख दान प्राप्त झालं आहे. यात दानपेटीत एक कोटी 81 लाख 82 हजार 136 रुपये जमा झाले आहेत. तर देणगी काउंटरव्दारे 76 लाख 18 हजार 143 रुपये दान करण्यात आले आहेत.
त्याचबरोबर अनेक भाविक हे ऑनलाईन देणगी देत असतात. यात डेबीट, क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक, डीडी आणि मनी ऑर्डर आदींद्वारे एक कोटी 41 लाख 52 हजार 812 रुपयांचं दान प्राप्त झालं आहे. यासोबत 8 लाख 64 हजारांचे 171 ग्रॅम सोने तर 01 लाख 21 हजार 813 रुपये किमतीची 2 किलो 713 ग्रॅम चांदीही अर्पण करण्यात आली आहे. या दानाव्यतिरिक्त उत्सव काळात सशुल्क तसेच ऑनलाईन पासेसव्दारे एकूण 61 लाख 43 हजार 800 रुपयांचे उत्पन्न संस्थानला प्राप्त झाले आहे.