Shirdi : शिर्डीतील साईमंदिराच्या सुरक्षेसाठी औद्योगिक सुरक्षा दलाची (CISF) सुरक्षा व्यवस्था देण्याच्या हालचाली सुरु झाल्यानंतर या प्रस्तावित केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) सुरक्षा व्यवस्थेला शिर्डीकरांनी विरोध केला आहे. यासह चार मागण्यांसाठी शिर्डीकरांनी आक्रमक पवित्रा घेत 1 मे, म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून शिर्डी शहर बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. 


शिर्डीच्या साईमंदिराच्या सुरक्षेसाठी साई संस्थान आणि महाराष्ट्र पोलिसांऐवजी CISF सुरक्षा व्यवस्था देण्याच्या हालचाली सुरू आहेत. औरंगाबाद उच्च न्यायलायत दाखल याचिकेनंतर या सगळ्या घडामोडी घडल्या आहेत. दुसरीकडे, साईबाबा संस्थानने हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. 


शिर्डीच्या साई मंदिराला दहशतवाद्यांकडून धोका असल्याने साई मंदिराला दुहेरी सुरक्षा व्यवस्था दिलेली आहे. साईबाबा मंदिरातील सुरक्षा व्यवस्था साई संस्थानच्या सुरक्षा विभागाबरोबर स्थानिक महाराष्ट्र पोलीस पाहतात. माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांना माहिती अधिकारात साईबाबा संस्थनाला दहशतवाद्यांबरोबर अनेक धोके असल्याची माहिती मिळाल्यावर सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी 2018 साली मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेत याचिका दाखल केली होती. यावर उच्च न्यायालयाने साई संस्थानचे म्हणने मागवले होते.


दरम्यान, CISF सुरक्षा व्यवस्था नेमणुकीबाबत उच्च न्यायालयाने साईबाबा संस्थानला याबाबत आपले मत मांडण्यास सांगितल्यानंतर त्यांनी सकारात्मक अहवाल दिल्याची माहिती शिर्डी ग्रामस्थांना समजली. त्यानंतर ग्रामस्थांनी याविरोधात न्यायालयीन लढा लढण्याचे ठरवले आहे. त्यासाठी निधी जमवण्सासाठी दोन दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी भिक्षा झोळी आंदोलनही केले होते. काल शिर्डीतील सर्वपक्षीय नेते आणि ग्रामस्थांची बैठक पार पडली, या बैठकीत प्रामुख्याने साई मंदिराला CISF सुरक्षा नकोय, तसेच अन्य चार मागण्या घेऊन शिर्डी ग्रामस्थांनी 1 मे, महाराष्ट्र दिनापासून शिर्डी शहर बेमुदत बंद आंदोलनाचा इशारा दिला. तसेच, 1 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता ग्रामदैवत हनुमान मंदिराजवळ ग्रामसभा घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे शिर्डी ग्रामस्थांनी सांगितले आहे.


साईजन्म वाद झाल्यानंतर शिर्डी शहर प्रथमच बंद ठेवण्यात आले होते आणि आता पुन्हा एकदा शिर्डी बंदची हाक दिल्याने पुन्हा साईंची शिर्डी बंद राहणार का? हे पाहणं महत्वाचं आहे. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश अवघ्या जगाला साईबाबांनी दिला. मात्र शिर्डीकरांनी आता साईभक्तांसाठी CISF नको, असे म्हणत दिलेला इशारा म्हणजे अधिकृत निर्णय झालेला नसताना सबुरीचा मंत्र दूर लोटल्याचे दिसून येते. 


काय आहेत शिर्डीकरांच्या मागण्या?



  • साईबाबा मंदिराला CISF सुरक्षा व्यवस्था नको, आहेतीच सुरक्षा योग्य.

  • साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद  IAS अधिकाऱ्याकडे नको. हे पद रद्द करून शासन उपजिल्हाधिकारी किंवा तहसीलदार, प्रांत अधिकाऱ्याकडे असावे.

  • साईबाबा संस्थानचे सध्या पाहत असलेल्या समितीमुळे सर्व कारभार मंदावलेला असून सर्व निर्णय प्रलंबित आहे, तर यावर राज्य शासनाने नियुक्त समिती नेमावी.

  • शिर्डी साईबाबा संस्थानवर लवकरात लवकर विश्वस्त मंडळांची नेमणूक करण्यात यावी, यात शिर्डीतील 50℅ विश्वस्त नेमणूक करावे.


महत्त्वाच्या बातम्या:


Mumbai Student Protest: पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे आठ तासानंतर आंदोलन मागे; विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी सुरू होते आंदोलन