अहमदनगर : विधानसभा निवडणुकीचे वेध लागताच सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? असा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.. विशेष म्हणजे त्यांनी आपण स्वतः कसे मुख्यमंत्री झालो, याचा घटनाक्रम देखील सांगितला आहे.
शरद पवार म्हणाले की, माझी पाच वर्षे आमदार म्हणून गेल्यानंतर सत्तेचे एक नाही तर दुसरे ठिकाण हे मला मिळत गेलं. मी गृह खात्याचा राज्यमंत्री झालो, कृषी खात्याचा मंत्री झालो, सुरुवातीच्या काळात राज्यमंत्री राहिलो. वसंतदादांचे सरकार गेल्यानंतर मी स्वतःच मुख्यमंत्री झालो. केवळ एकदाच मुख्यमंत्री झालो नाही तर चार वेळेला मुख्यमंत्री झालो. हा घटनाक्रम सांगितल्यानंतर त्यांनी रोहित पवार यांच्या मंत्री होण्याबाबत सूचक वक्तव्य केले.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
"रोहितची पाच वर्ष तुमच्या सेवेसाठी आणि त्यानंतरची वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी", असं म्हणत शरद पवार यांनी रोहित पवारांच्या आगामी मंत्रीपदाबाबत सूचक वक्तव्य केलं. विशेष म्हणजे "महाराष्ट्राची सेवा ही महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल अशी असेल", असं वक्तव्य शरद पवारांनी केले. यामुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. शरद पवारांनी स्वतःचा राज्यमंत्री ते मुख्यमंत्री असा प्रवास सांगत एक प्रकारे रोहित पवार यांचा देखील मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास तर सांगितला नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. शरद पवारांच्या वक्तव्यानंतर आता रोहित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार का? अशाही चर्चांना उधाण आले आहे. रोहित पवार यांच्या मतदारसंघातील जामखेड तालुक्यातील खर्डा येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यात शरद पवार बोलत होते.
राम शिंदेंचा शरद पवारांना सवाल
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी आयोजित केलेल्या कुसडगाव येथील SRPF केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रचंड गोंधळ झाला होता. भाजप आमदार राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात या SRPF केंद्रावरून एकप्रकारे श्रेयवाद रंगल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच रोहित पवार आणि समर्थकांनी SRPF केंद्राबाहेर ठिय्या देत गोंधळ घातला. शरद पवार काल अहमदनगरच्या दौऱ्यावर आले असताना त्यांना उद्देशून राम शिंदे यांनी एक ट्विट करत रोहित पवारांवर निशाणा साधला होता. राम शिंदे यांनी ट्विट करत म्हंटले होते की, शरद पवार गेल्या पन्नास साठ वर्षांपासून देशाच्या राजकारणात असल्याने त्यांना राजशिष्टाचार चांगला माहित आहे, SRPF कुसडगाव सेंटरमध्ये त्यांच्या नातवाने जो स्टंट केला व SRPF, पोलिसांना वेठीस धरले. नातवाचा कालचा स्टंट बरोबर होता की चुकीचा होता हे सांगून राजशिष्टाचार काय असतो हे त्यांनी कर्जत-जामखेडसह राज्यातील जनतेला सांगितले पाहिजे, असा सवाल त्यांनी शरद पवारांना विचारला.
आणखी वाचा
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला