अहमदनगर : राज्याचं लक्ष लागलेल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून (Ahmednagar Lok Sabha Election) कोण विजयी होणार याबद्दल तर्क वितर्क लावले जात आहेत. आता भाजपचे आमदार आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी त्याबद्दल अंदाज व्यक्त केला आहे. अहमदनगरमधून सुजय विखेच निवडून येतील, मात्र यावेळी त्यांचे मताधिक्य मात्र घटेल असा दावा राम शिंदे यांनी केला आहे. ते माध्यमांशी संवाद साधत होते. 


राम शिंदे म्हणाले की, अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत अनेक अफवा पसरवल्या गेल्या, तथाकथित सर्व्हे देखील झाले. मात्र आम्हाला विश्वास आहे की यावेळी पुन्हा विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील निश्चित विजय होतील. मात्र मागच्या निवडणुकीत सुजय विखेंना जेवढे मताधिक्य मिळाले तेवढे मिळू शकणार नाही. ते यावेळी जवळपास एक लाखाच्या फरकाने ते विजयी होतील. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमुळे सुजय विखे विजयी होणार


लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी सभा झाली त्याचा फायदा सुजय विखेंना होणार असल्याचं राम शिंदे म्हणाले. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी जे काम केले ते प्रचारा दरम्यान लोकांपर्यंत पोहचवण्यात यशस्वी झाल्याने सुजय विखेंचा विजय होईल.


मताधिक्य घटण्याचा अंदाज व्यक्त केला, त्याचे कारण विचारले असता राम शिंदे म्हणाले की, जुन्या काळात पंतप्रधान मोदींनी केलेल्या कामाबाबत नवीन मतदारांना जास्त माहिती नाही. एखादा पक्ष सातत्याने सत्तेत असेल तर त्यांनी त्यांच्या काळात केलेलं काम अनेकांना माहिती नसतं. त्यामुळे काहीसे मताधिक्य घटेल.


निकालापूर्वीच दोन्ही उमेदवारांचे 'भावी खासदार' म्हणून बॅनर


लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे. मात्र तत्पुर्वीच अहमदनगर जिल्ह्यातील उत्साही कार्यकर्त्यांनी आपल्याच नेत्याचा विजय होईल असा विश्वास बॅनरच्या माध्यमातून व्यक्त केल्याचे दिसत आहे. भाजप उमेदवार सुजय विखेंच्या समर्थकांनी अशाच पद्धतीने एमआयडीसी परिसरात "परमंड खासदार , गुलाल आपलाच" असा आशयाचे बॅनर लावत सुजय विखेच विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. प्रवीण सप्रे या कार्यकर्त्यांने हे बॅनर लावले आहेत. काही दिवसांपूर्वी निलेश लंके यांचे देखील असेच बॅनर श्रीगोंदा आणि जामखेडमध्ये लागल्याचे पाहायला मिळाले होते.


ही बातमी वाचा: