Ahmednagar Lok Sabha Election 2024 : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी नगरच्या स्ट्राँगरुममध्ये (Strongroom) ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम (EVM) मशीन्सच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. स्ट्राँगरुममध्ये घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप निलेश लंकेंनी केला. यामुळे एकच खळबळ उडाली असून आता यावर अहमदनगरचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 


निलेश लंके यांनी एक्स या सोशल मिडिया माध्यमावर व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, संरक्षणव्यवस्था थोडे उठा माणूस गोदामापर्यंत आला. काल रात्री आमच्या नगर दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका इसमाने प्रवेश करत चक्क शटरपर्यंत जात सीसीटीव्हीमध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला. माझ्या सहकार्याने तो लगेच हाणून पाडला. माझे सहकारी हा इसम पकडू शकतात मग कोणतीही पूर्व सूचना न देताना गेलेल्या त्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही? कुंपणच आता शेत खातय. लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय पण प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहतय, असे त्यांनी म्हटले आहे. 


निलेश लंके यांनी केलेलं ट्विट अपुऱ्या माहितीवर आधारित : जिल्हाधिकारी


निलेश लंके यांनी केलेलं ट्विट हे अपुऱ्या माहितीवर आधारित असल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी म्हटले आहे. सीसीटीव्हीची वायर दुरुस्त करण्यासाठी कर्मचारी गेला होता. ज्या ठिकाणी गोडाऊन आहे त्या ठिकाणी तीन पद्धतीची सुरक्षा आहे. सीसीटीव्हीची वायर लीक झाल्याचा प्रकार तेथील कर्मचाऱ्याने लक्षात आणून दिला. त्या ठिकाणी जे वेंडर कर्मचारी आहे त्यांना आम्ही ओळखपत्र दिलेले आहे. संबंधित कर्मचारी परवानगी घेऊन आत गेला होता. दुरुस्ती करून कर्मचारी बाहेर आला, असे निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी सांगितले. 


रीतसर तक्रार करणार : निलेश लंके 


दरम्यान, अहमदनगर येथील EVM सुरक्षाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर निलेश लंके यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री घडलेल्या घटनेबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी लंके यांनी बोलल्याचे सांगितलं असून रात्री त्यांनाही संबंधित व्यक्ती कोण आहे हे माहित नव्हतं असं लंके यांनी म्हटले आहे. या सर्व प्रकाराबाबत आपण रीतसर तक्रार करणार आहोत, अशी त्यांनी म्हटले.


इतर महत्वाच्या बातम्या 


Ahmednagar Lok Sabha : अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...


अजितदादांनी तेव्हा धाडस दाखवलं नाही, आता लंकेंना दमदाटी करून काय उपयोग? बाळासाहेब थोरातांचा खोचक टोला