Radhakrishna Vikhe Patil : धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे माढ्यातून रिंगणात असलेल्या भाजपचे रणजीतसिंह निंबाळकर यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीवरही शिक्कामोर्तब झाले आहे. 


विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil) हे सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी राहणार आहेत. त्यामुळे माढ्यात भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण झालं आहे. यावरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी मोहिते पाटलांवर जोरदार टीका केली आहे. 


मोहिते पाटलांना काळ क्षमा करणार नाही


मोहिते पाटलांनी हा निर्णय घेणं अतिशय दुर्दैवी आहे. ज्यांनी विश्वासघात केला त्यांच्यासोबत जाण्याची चूक ते करताय. देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटलांना मदत केली होती. त्यांच्या मुलाला विधानपरिषदेवर घेतलं होतं. त्यांनी अजूनही विचार करावा. जनता उघड्या डोळ्यांनी पाहतेय, त्यांना काळ क्षमा करणार नाही, अशी टीका मोहिते पाटलांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेशावर विखे पाटलांनी केली आहे. 


स्वतःच मराठा समाजाच्या उमेदवारांना पाडणार आहात का?


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी घेतलेल्या भूमिकेवर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, अनेक ठिकाणी मराठा समाजाचेच उमेदवार उभे आहेत. आपण स्वतःच मराठा समाजाच्या उमेदवारांना पाडणार आहात का? असा सवाल त्यांनी मनोज जरांगे यांना केला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम महायुती सरकारने केलंय. जरांगे पाटलांनी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. 


संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय


मोदींसारखा भयंकर चेहरा त्यांच्याकडे आहे. तो भीतीदायक आहे. तो भला चेहरा नाही. दहा वर्षांत या माणसाने भयंकर कांड केले. त्यामुळे देशाचे नुकसान झाले, अशी टीका संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली होती. यावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, संजय राऊत यांना आता काही काम राहिलेलं नाही. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय. ते लायकीपेक्षा जास्त बोलायला लागलेत. प्रधानमंत्री मोदींच्या नखाची सर त्यांना येणार नाही. ते फक्त बावचळल्या सारखे आणि डोक्यावर परिणाम झाल्यासारखे बोलतात. त्यांच्याकडे जनता लक्ष देत नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली. 


सुजय विखे विक्रमी मताधिक्याने विजयी होतील


सुजय विखे पाटील यांच्या प्रचाराबाबत राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, आम्ही युतीचा धर्म पाळतोय. शिर्डीत खा. सदाशिव लोखंडे हे महायुतीचे उमेदवार आहेत. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नगर दक्षिणमध्ये डॉ. सुजयने काम केले आहे. डॉ. सुजय विखे विक्रमी मताधिक्याने विजयी होतील याबद्दल शंकाच नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


शरद पवार - सुशीलकुमार शिंदे - मोहिते पाटील, 20 वर्षांनंतर त्रिकुट एकत्र, आता भाजपचं काय होणार? जयसिंह मोहिते पाटलांनी मांडलं गणित