अकोले : निळवंडे धरणाच्या (Nilwande Dam) निकृष्ट कालव्यांच्या कामाविरोधात आज राष्ट्रवादी शरद पवार गटाने (NCP Sharad Pawar Group) माजी जिल्हा परिषद सदस्य सुनीता भांगरे (Sunita Bhangare) यांच्या नेतृत्वात चाकबंद आंदोलन केले. यावेळी हातात दगड घेऊन कुलूप तोडण्यासाठी आंदोलक आक्रमक झाल्याचे दिसून आले. आवर्तन बंद केले नाही तर पाण्यात उड्या मारण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे.

Continues below advertisement

धरणाच्या निकृष्ट कालव्यांच्या कामा विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात आले. निळवंडे धरणाच्या चाकापर्यंत आंदोलक पोहचले होते. अनेक वेळा मागणी करूनही कार्यवाही होत नसल्याने आंदोलन करण्यात आले असून हातात दगड घेऊन कुलूप तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी आंदोलकांना गेट जवळ रोखून धरले मात्र डाव्या कालव्याचे पाणी बंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 

प्रशासनाकडून वेळ मारून नेण्याचे काम

यावेळी सुनीता भांगरे म्हणाल्या की,  दोन वर्षापासून या ठिकाणी उजवा आणि डावा या दोन्ही तालुक्याला पाणी सुरू आहे. परंतु या विभागाने पाणी पाटात सोडले आहे की, घरात सोडले आहे ते कळत नाही. आम्ही तिसऱ्यांदा आंदोलन करत आहोत. मात्र, प्रशासन केवळ आश्वासन देऊन वेळ मारून नेत आहे. मागच्या वेळेस आम्ही आंदोलन केले तेव्हा सांगितले की, दुसऱ्या रोटेशन चालू करू तेव्हा पाटाचे काँक्रिटीकरण होणार आणि पूल बांधणार, मात्र कुठलेही काम झालेले नाही. फक्त वेळ मारून नेण्याचे काम प्रशासन करत आहे. आज आम्ही हे पाणी बंद करणार आहोत. 

Continues below advertisement

...तर पाण्यात उड्या मारण्याचा इशारा

शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरले आहे. मुलांना शाळेत जात येत नाही. आमची मागणी आहे की, ते मागच्या वेळेस झालेल्या पंचनाम्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा. पुन्हा आवर्तन सुरु होण्याआधी काँक्रिटीकरण आणि पुलाचे काम झाले पाहिजे. आज पाणी बंद केले नाही तर आम्ही सर्व महिला या पाण्यात उड्या मारू, असा इशारा सुनिता भांगरे यांनी यावेळी दिला. 

...म्हणून आज बहीण झाली लाडकी

यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी उमेदवारी जाहीर केलेले  तरुण उमेदवार अमित भांगरे म्हणाले की, अडीच वर्षापासून शेतकऱ्याच्या हिताचा एकही निर्णय झालेला नाही. शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. सरकार फक्त योजना आणण्यात व्यस्त आहे. लाडकी बहीण योजना काढली. लोकसभेच्या निवडणुकीला पडली मतांची खडकी म्हणून आज आमच्या बहिणी झाल्यात यांच्यासाठी लाडकी, अशी परिस्थिती राज्यभरात झाली आहे. आम्हाला दीड हजार रुपयांची लाचारी नको. आमच्या मनगटात ताकद आहे. शेतकरी उद्ध्वस्त करायचे काम करू नका. वावरात पाणी तुंबत आहे तरी तुमचे लक्ष जात नाही. तुम्ही आम्हाला नुकसान भरपाई देत नाही. तुम्ही कशासाठी सरकार चालवत आहात याचे उत्तर शासनाने द्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 

आणखी वाचा 

रोहित पाटलांनंतर विधानसभेसाठी पवारांकडून दुसरा तरूण उमेदवार जाहीर, राष्ट्रवादीचे तीन उमेदवार ठरले