संगमनेर : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात देखील अजित पवार (Ajit Pawar) निधी देताना दूजाभाव करत होते, असा मोठा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केला आहे. संगमनेर शहरातील आपल्या निवासस्थानी बाळासाहेब थोरात यांनी गणरायाचं पूजन केलं. बाळासाहेब थोरात यांच्या पत्नी कांचन थोरात, मुलगी जयश्री व जावई आणि नात गणरायाच्या पूजन सोहळ्यात सहभागी झाले होते. गणरायाचे विधीवत पूजन केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारवर (Mahayuti Government) जोरदार हल्ला चढवला तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, पाच वर्ष निधी वाटपात भेदभाव झाला. काही आमदारांना प्रचंड निधी तर काहींना निधीच नाही. पाच वर्षे भेदभाव करण्याचे काम अर्थ विभागाकडून झालं आहे. पाच वर्षे हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतोय. महाविकास आघाडीच्या काळात आम्ही देखील तक्रार केली होती, असा गौप्यस्फोट अजित दादांच्या निधी वाटपावर बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
स्वतःची कातडी वाचवण्यासाठी राजकारण
घर फोडण्याचे काम काही जण करत आहेत. घरात फूट पडणे समाजाला आवडत नाही, मी चूक केली, तुम्ही ती करू नका, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या व माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या कथित संभाव्य बंडावर भाष्य केले होते. याबाबत विचारले असता बाळासाहेब थोरात म्हणाले की. या पाच वर्षाच्या राजकारणाची इतिहासात दुर्दैवी म्हणून नोंद होईल. राजकारणाचा स्थर घसरला आहे. पाच वर्षात कुटुंबाकुटुंबात वाद निर्माण झाले आहेत. मात्र महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. मी आठ पंचवार्षिक पाहिल्या, पण ही पंचवार्षिक खूपच वाईट आहे. सत्तेसाठी आणि स्वतःची कातडी वाचवण्यासाठी राजकारण सुरू आहे. महाराष्ट्रातील जनता तुम्हाला क्षमा करणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
देवेंद्र फडणवीस अडचणीत आले ही वस्तुस्थिती
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधक चक्रव्यूह करुन माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न करत असलात तरीही मी आधुनिक अभिमन्यू आहे, चक्रव्युहात कसं शिरायचं हे मला माहित आहे आणि बाहेर कसं यायचं आहे हे पण मला माहीत आहे, असे वक्तव्य केले. याबाबत विचारले असता बाळासाहेब थोरात म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांची आजची स्थिती कुणी दुसऱ्याने केली नाही. त्यांच्याच पक्षाने त्यांची ही अवस्था केली आहे. ज्यांना चक्की पिसिंग म्हणाले, त्यांनाच सोबत घेण्याची जबाबदारी फडणवीसांवर टाकली. देवेंद्र फडणवीस अडचणीत आले ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी स्वतःला अभिमन्यूची उपमा दिली. चक्रव्यूहातून बाहेर पडताना या अभिमन्यूची अवस्था काय होणार? हे माहीत नाही. ही अवस्था विरोधकांनी नाही तर त्यांच्याच पक्षाने केली असल्याचे टीका त्यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.
आणखी वाचा