अहमदनगर : रोहित पाटील यांच्यापाठोपाठ शरद पवारांकडून विधानसभेसाठी आणखी एका तरूण उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघातून अमित भांगरे (Amit Bhangre) यांच्या पाठीशी उभे राहा असं आवाहन शरद पवारांनी (Sharad Pawar) केलं. या ठिकाणचे अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे (Kiran Lahamate) यांना खाली बसवा असं आवाहनही शरद पवारांनी केलं आहे. अकोलेतील शेतकरी मेळाव्यामध्ये शरद पवारांनी हे आवाहन केलं आहे. 


शरद पवारांनी या आधी तासगाव मतदारसंघातून दिवंगत नेते आर आर पाटील यांचे सुपूत्र रोहित पाटील यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर आता अकोले मतदारसंघातून दुसरा तरुण उमेदवार जाहीर केला. त्यामुळे अकोले मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे विरुद्ध शरद पवार गटाचे अमित भांगरे अशी लढत होणार हे स्पष्ट झालं आहे. 


डॉक्टरला निवडून दिलं अन् भलतीकडेच जावून बसला


अकोलेकरांना आवाहन करताना शरद पवार म्हणाले की, अमित भांगरे आणि त्याच्या सहकाऱ्यांना शक्ती द्या. तुमची मदत असेल तर अकोल्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही. पाच वर्षांपूर्वी एका डॉक्टरला (आमदार किरण लहामटे) मी संधी दिली. मला वाटलं साधा माणूस आहे, शब्दाला किंमत देईल. त्यांनी काही झालं तरी पवार साहेबांची साथ सोडणार नाही असं भाषण केलं होतं. पण मुंबईत गेल्यानंतर मात्र हा भलतीकडे जाऊन बसला. कुठं बसायचं हे ज्याला कळत नाही त्याला विधानसभेत खाली बसवायची वेळ आली आहे. आता अमित भांगरे या तरुणाच्या पाठीशी शक्ती उभी करा. तरुणांच्या ताकदीवर अकोले आणि महाराष्ट्रातले राजकारण बदलल्याशिवाय राहणार नाही.


किरण लहामटेला खाली बसवा


अकोलेतील आमदार किरण लहामटेला खाली बसवा आणि या ठिकाणी अमित भांगरेंना संधी द्या असं आवाहन शरद पवारांनी केलं आहे. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. 


या आधी शरद पवारांनी सांगली जिल्ह्यातील तासगावमधून रोहित पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यानंतर करमाळ्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघातून नारायण पाटील यांच्या नावाची घोषणा केली. आता अमित भांगरे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीचे विधानसभेसाठी तीन उमेदवार ठरल्याचं दिसून येतंय. 


ही बातमी वाचा: