Radhakrishna Vikhe Patil :  भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यांच्याच गावात जोरदार धक्का बसला आहे. राष्ट्रवादीने लोणी खुर्द सहकारी सेवा सोसायटीत विखे गटाचा 13/0 असा दारुण पराभव करत २० वर्षांनंतर सत्तांतर घडवून आणले आहे.


आमदार राधाकृष्ण विखे पाटील नेतृत्व करत असलेल्या शिर्डी मतदार संघात सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका पार पडल्या. यातील अनेक सोसायट्या बिनविरोध करण्यात विखे पाटलांना यश आले. मात्र आता विखे पाटलांना त्यांच्याच लोणी खुर्द गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनार्दन घोगरे यांनी जोरदार धक्का दिला आहे. लोणी खुर्द गावात राष्ट्रवादीच्या जनार्दन घोगरे यांच्या परिवर्तन मंडळाने बाजी मारत विखे गटाचा १३/० असा दणदणीत पराभव करत विजय संपादित केला. या  विजयानंतर परिवर्तन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.


दोन वर्षांपूर्वी लोणी खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत देखील जनार्दन घोगरे यांच्या पॅनलने विखे गटाचा पराभव करत ग्रामपंचायतीवर वर्चस्व स्थापन केले होते. आता पुन्हा सोसायटी निवडणुकीत राष्ट्रवादीच्या घोगरे यांनी दणदणीत विजय मिळवून २० वर्षांनंतर सत्तांतर घडवून आणले. विखे गटाला पराभवाचा सामना करावा लागल्याने संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात या निकालाची चर्चा होत आहे.


तर बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात देखील विखे गटाचा पराभव झाला. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या  नेतृत्वाखाली शेतकरी मंडळाने सर्व जागांवर विजय मिळवत विखे गटाचा १३/० असा पराभव केला आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे जन्मगाव असलेले जोर्वे हे गाव शिर्डी विधानसभा मतदारसंघात जोडलेले असले तरी विखेचा करिष्मा गावात दिसून आला नाही. दोन्ही गावच्या सोसायटी निवडणुकीत विखेंना धक्का बसला असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका रंगतदार होणार एव्हढं मात्र नक्की.


आणखी वाचा :