Puntamba Protest : पुणतांबा येथे गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दोन दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. कृषी मंत्री दादा भुसे ( Dada Bhuse ) यांनी आज शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन दोन दिवसांसाठी स्थिगीत करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी आणि दादा भुसे यांच्यात अडीच तास चर्चा झाल्यानंतर धरणे आंदोलनाच्या चौथ्या दिवशी दादा भुसे यांच्या शिष्टाईला यश आलं आहे. मंगळवारी मुंबईत चर्चा केल्यानंतर आता 8 तारखेला आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट होणार आहे.
2017 च्या ऐतिहासिक संपानंतर पाच वर्षांनी अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 1 जून पासून धरणे आंदोलन सुरू झाले होते. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी कृषिमंत्री दादा भुसे यांनी आंदोलकांची भेट घेत अडीच तास चर्चा केली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधत मंगळवारी मुंबईत बैठक घेण्याची घोषणा केली. त्यानंतर दोन दिवसांसाठी पुणतांबा आंदोलन स्थगित करण्यात आलं.
शेतऱ्यांसोबत अडीच तास चर्चा केल्यानंतर कृषीमंत्री दादा भुसे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत झालेल्या चर्चेची माहिती दिली.
शेतकऱ्यांच्या मागण्या
1) ऊसाला एकरी एक हजार रूपये अनुदान द्यावे2) शिल्लक ऊसाला हेक्टरी दोन लाख रूपये द्यावे3) कांद्यासह सर्व पिकांना हमीभाव द्यावा4) कांद्याला प्रती क्विंटल 500 रूपये अनुदान द्यावे5) शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण आणि सुरळीतपणे वीज मिळावी6) थकित विजबिल माफ झाले पाहिजे7) कांदा आणि गव्हाची निर्यात बंदी उठवावी8)सर्व पिकांना आधारभूत किंमत दिली जावी त्यासाठी आयोगाची स्थापना करून निर्णय घ्यावा9) 2017 साली केलेल्या कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी10) नियमित कर्ज भरणारांचे अनुदान दिले जावे11) दुधाला ऊसाप्रमाणे एआरपी लागू केला जावा12) दुधाला कमीतकमी चाळीस रूपये दर दिला जावा13) खाजगी दूध संकलन केंद्रात होणारी लूट थांबवावी14) वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्यास भरपाई दिली जावी15) शेतकरी आंदोलनात दाखल गुन्हे मागे घेतले जावे16) वन हक्क कायद्यानुसार आदिवासींच्या जमिनी त्यांच्या नावावर केल्या जाव्या