Jalgaon News Update : लग्न समारांभासाठी होणाऱ्या मोठ्या खर्चाला फाटा देत जळगावमधील अहिरे परिवाराने आपल्या मुलीच्या लग्नात राष्ट्र पुरुषांच्या पुस्तकांचे लग्नासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांना वाटप केले आहे. महापुरूषांचे विचार घराघरात रुजविणारा तसेच वाचन संस्कृती रुजविणाऱ्या या अनोख्या विवाह सोहळ्याचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. जळगव शहरात आज विशाखा आणि प्रणील पवार यांचा विवाह पार पडला. या विवाह समारंभात अहिरे कुटुंबाकडून पाहुण्यांना पुस्तके भेट देण्यात आली.
जळगावमधील बामसेफ संघटनेचे पदाधिकारी सुमित्र अहिरे यांची कन्या विशाखा आणि मुंबई येथील प्रणिल पवार यांचा विवाह सोहळा रविवारी जळगाव शहरातील लाडवंजारी सभागृहात पार पडला. यावेळी नागरिकांमध्ये समता, बंधुता रुजावी, धार्मिक तसेच जातीभेद नष्ट व्हावेत, यासाठी प्रत्येकाने महापुरूषांचे विचार आत्मसाद करावे, ते घराघरात पोहचावेत, मोबाईमुळे लोप पावत असलेली वाचन संस्कृती रुजावी या पार्श्वभूमीवर लग्नात आलेल्या पाहुण्यांना महापुरूषांचे जीवन चरित्र तसेच विविध विषयांवरील पुस्तके वाटप करण्याचा निर्णय सुमित्र अहिरे, नवरदेव प्रणिल आणि वधू विशाखा यांनी घेतला व लग्न समारंभासाठी आलेल्या पाहुण्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
सुमित्र अहिरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, गौतम बुध्द, राजमाता जिजाबाई यांच्यासह विविध महापुरूषांची पुस्तके खरेदी केली. सभागृहाच्या प्रवेशव्दाराजवळ पुस्तकांचे दालन थाटून लग्नाला आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना त्यांच्या आवडी प्रमाणे पुस्तके भेट देण्यात आले. लग्नात नवदाम्पत्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आल्याने वऱ्हाडी मंडळींनी या उपक्रमाचं कौतुक केलं आहे. शिवाय या पुस्तक वाटपाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनकडून देखील या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.
लग्नातील मोठ्या खर्चाला फाटा देत महापुरूषांची पुस्तके वाटप करुन विशाखा आणि प्रणील पवार या नवविवाहित दाम्पत्याने समाजासमोर आदर्श ठेवलाय. विवाह सोहळ्यात पुस्तके वाटपामुळे विचारांची देवाणघेवाण तर होईलच, शिवाय मोबाईलमुळे लोप पावत चाललेली वाचन संस्कृतीही रुजेल यात शंका नाही, अशा भावाना उपस्थित पाहुणे मंडळींनी व्यक्त केल्या आहेत.