Maharashtra Shirdi News: देशाच्या चलनातून 2 हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank of India) घेतला आहे. त्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत जवळच्या कोणत्याही बँकेत जाऊन दोन हजारांच्या नोटा बदलून घेता येणार आहेत. अशातच दोन हजारांच्या नोटा चलनातून मागे घेण्याच्या आरबीआयच्या निर्णयानंतर शिर्डीतील (Shirdi) साई मंदिराच्या (Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi, Ahmednagar) दानपेटीत मात्र दोन हजारांच्या नोटांचं दान वाढल्याचं दिसून आलं आहे. एरव्ही चलनात न दिसणाऱ्या दोन हजारांच्या नोटा (Indian 2000 Rupee Note) साईंच्या दानपेटीत मात्र भरुभरुन दान करण्यात आल्या आहेत. अवघ्या महिन्याभरात तब्बल अडीच कोटी रुपयांच्या 12 हजार नोटा साई मंदिराच्या दानपेटीत भक्तांकडून दान करण्यात आल्या आहेत. 


गेल्या अनेक महिन्यांपासून दोन हजारांची नोट ना चलनात दिसत होती ना एटीएममध्ये. मात्र मे महिन्यात रिझर्व्ह बँकेनं मोठा निर्णय घेत 30 सप्टेंबरनंतर दोन हजारांची नोट चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर साईंच्या चरणी भक्तांकडून दान करण्यात आलेल्या दानात तुरळक आढळणाऱ्या दोन हजारांच्या नोटांच दिसत आहे.


भाविकांकडून दानपेटीत दोन हजारांच्या नोटांचं भरभरुन दान 


गेल्या महिनाभरात दानपेटीतील दानात दोन हजारांच्या नोटांची मोठी वाढ झाली आहे. एकूण मिळलेल्या दानात दोन हजारांच्या नोटांच्या स्वरूपात अडीच कोटींचं दान साईबाबा संस्थानला प्राप्त झालं आहे. मागील एका महिन्यात साई संस्थानाला दान स्वरूपात दोन हजारांच्या एकूण 12 हजार नोटा प्राप्त झाल्या आहेत. दक्षिणापेटीत चार हजार तर देणगी काऊंटरवर आठ हजार नोटांचे दान प्राप्त झाले आहे. याबाबत साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांनी माहिती दिली. 


'त्या' प्रकरणी शिर्डी संस्थानाकडून गुन्हा दाखल


दरम्यान, सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीला विशिष्ट धर्माशी जोडण्याचा काही समाजकंटक प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वी साईबाबा संस्थानानं एका विशिष्ट समुदायाला मोठी रक्कम दान दिल्याबद्दल एक व्हॉट्सअॅप पोस्ट प्रसारित करण्यात आली होती. त्यानंतर उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु आता साईबाबा संस्थानानं चुकीची माहिती पसरवणाऱ्या लोकांविरोधात कडक पावलं उचलली असून साईबाबा संस्थानाची बदनामी करणाऱ्यांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचंही संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांनी सांगितलं आहे.


दोन हजारांच्या नोटा चलनातून मागे, RBI चा निर्णय 


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयनं 2 हजार रुपयांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आरबीआयनं इतर बँकांना 2 हजार रुपयांच्या नोटा जारी करणं थांबवा, असा सल्लाही दिला आहे. इथून पुढे 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद होणार आहे. या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करता येतील, असंही आरबीआयनं स्पष्ट केलं आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नागरिकांना या नोटा बँकेतून बदलून घेता येतील, असंही आरबीआयनं स्पष्ट केलं आहे.