Shirdi Gurupaurnima : गुरुपौर्णिमेचा (Gurupaurnima) दिवस अवघ्या दोन दिवसांवर आला असून या पार्श्वभूमीवर शिर्डीत जोरदार तयारी सुरु आहे. वर्षभर गुरुंनी दिलेल्या ऋणातून उतराई होण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिर्डीतही (Shirdi) भाविकांची गर्दी होत आहे. येत्या 3 जुलै रोजी उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने साई बाबा मंदिर (Sai Baba Temple) भक्तांसाठी रात्रभर खुले राहणार असल्याने यंदाही भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याची शक्यता आहे.
शिर्डीच्या साई मंदिरात (Shirdi Sai Mandir) दरवर्षी तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला उद्यापासून सुरवात होणार असून 2 ते 4 जुलै दरम्यान हा उत्सव साजरा केला जाणार असून साई संस्थान कडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. 3 जुलै रोजी उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने भाविकांना दर्शनासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी साई समाधी मंदिर रात्रभर खुले राहणार आहे. तर 4 जुलै रोजी पहाटेची काकड आरती होणार नाही. साईबाबा हयात असल्यापासून गुरुपौर्णिमा उत्सव शिर्डीत साजरा केला जातो. या तीन दिवसीय उत्सवानिमित्त साईबाबांना गुरुस्थानी मानून लाखो साईभक्त शिर्डीत दर्शनासाठी येत असतात. तर अनेक पायी पालख्यासुद्धा शिर्डीत येण्यास सुरवात झाली आहे.
देश-विदेशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांना भाविक गुरुस्वरुप मानतात. भारतीय संस्कृतीत गुरुला देवापेक्षा श्रेष्ठ मानलं जातं हिच भावना ठेवून लाखो भाविक साई दर्शनासाठी शिर्डीत दाखल होत आहेत. नाशिक, पुणे, मुंबई आदी ठिकाणाबरोबरच परराज्यातील अनेक पालख्या साईबाबांच्या नामाचा जयघोष करत शिर्डीत दाखल होत आहेत. या व्यतिरिक्त अनेक भाविक रात्रभर पायी प्रवास करत शिर्डीत दाखल झाले आहेत. तसेच शिर्डीत दाखल होणाऱ्या साईभक्तांना मनसोक्त दर्शन घेता यावं, यासाठी साई समाधी मंदिर रात्रभर खुले ठेवले जाणार आहे.
साई समाधी मंदिर रात्रभर खुले
गुरुपौणिमेच्या दिवशी म्हणजेच 3 जुलै रोजी सकाळी काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा, पोथी आणि वीणा यांची सवाद्य मिरवणूक गुरुस्थान मार्गे द्वारकामाईत नेण्यात येणार आहे. गुरुला भगवंत मानून गुरुंनी आपल्यावर केलेल्या उपकरातून उतराई होण्याचा गुरुपौर्णिमेचा दिवस असतो. साई बाबांनी दिलेला सर्वधर्म समभावाचा संदेश जगभरात नेण्याचा संकल्प करण्यासाठी लाखो साईभक्त शिर्डीत दाखल होतात. दरम्यान येत्या तीन दिवसात चार ते पाच लाख भाविक साईचं दर्शन घेण्याची शक्यता असून बाबांच्या झोळीतही मोठ्या प्रमाणात दान जमा होणार असल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांसाठी दर्शनासाठी साई समाधी मंदिर रात्रभर खुले ठेवले जाणार आहे.