Ahmednagar Bhagyashree Fand : सीआयएफमध्ये नोकरीला असताना मुलींसाठी नोकरी सोडली, स्वतः कुस्तीपटू असताना परिस्थितीमुळे खेळात पुढे जाता आले नाही, मात्र जमीन विकून मुलींसह इतर खेळाडूंचे भविष्य घडावे म्हणून क्रीडा संकुल उभं केलं. आज त्यांच्या एका मुलीने महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला आहे. कोल्हापूर (Kolhapur) येथे झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) स्पर्धेत भाग्यश्री फंड हीने महिला महाराष्ट्र केसरीवर मोहोर उमटवली आहे. 


ही गोष्ट आहे, नुकतीच कोल्हापूर येथील महाराष्ट्र केसरी स्पर्धेत महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवणाऱ्या भाग्यश्री फंड (Bhagyashree Fand) हिच्या कुटुंबीयांची. आतापर्यंत महाराष्ट्र राज्यात केवळ पुरुषांसाठी महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा आयोजित करण्यात येत होती. मात्र यावर्षी पासून महिलांना संधी मिळावी, या हेतूने महाराष्ट्र सरकारने महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केल्या. कोल्हापूर जिल्ह्यात पार पडलेल्या या स्पर्धेत अहमदनगरच्या भाग्यश्री फंड हीने वडिलांच्या मेहनतीचे चीज करत फंड कुटुंबियांचे नाव काढले आहे. 


कोल्हापूर येथे झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत महिला महाराष्ट्र केसरीचा बहुमान श्रीगोंदा (Shreegonda) येथील भाग्यश्री फंड हिने पटकावला. मात्र, इथंपर्यंतचा प्रवास काही सोप्पं नव्हता. तिच्या या प्रवासात तिच्या वडिलांची मोठी साथ लाभली. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात फंड कुटुंबीय वास्तव्यास आहे. वडील हनुमंत फंड (Hanumant Fand) यांनी काही काळ CISF मध्ये देशसेवा केल्यानंतर मुलींसाठी नोकरी सोडून गावाकडे छोट्या मोठ्या कुस्त्या करू लागले. तर आई पूजा फंड या शालेय जीवनात कबड्डीपटू होत्या. मात्र परिस्थितीमुळे आणि कौटुंबिक वातावरण खेळासाठी पोषक नसल्याने दोघांनाही खेळात पुढे जाता आलं नाही. मात्र हनुमंत आणि पूजा यांनी आपली स्वप्न आपल्या दोन्ही मुली भाग्यश्री आणि धनश्रीच्या माध्यमातून पूर्ण केल्याचे अवघ्या महाराष्ट्राला दिसून आलं. त्या दोघीही बहिणी कुस्तीपटू असून अनेक राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी चांगली कामगिरी केली. तर कोल्हापूर येथे झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत भाग्यश्रीने महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला आहे.


क्रीडा संकुलात सत्तर कुस्तीपटूंचं प्रशिक्षण 


एवढंच नाही तर मुलींना कुस्तीचे योग्य प्रशिक्षण मिळावे. यासाठी त्यांनी श्रीगोंदा सारख्या ठिकाणी भाग्यश्रीच्या नावानेच इंटरनॅशनल कुस्ती संकुल उभं केलंय...त्यासाठी त्यांनी स्वतःची तीन एकर शेती देखील विकून टाकली. समाजातील अनेक दानशूरांनी त्यांना यात मदत केली. या कुस्ती संकुलात राज्यातील आणि राज्याबाहेरील 70 कुस्ती पटू प्रशिक्षण घेत आहे. सकाळी चार वाजल्यापासूनच या कुस्ती संकुलात भाग्यश्री, धनश्री सोबत इतरही कुस्तीपटूचा दिनक्रम सुरू होतो. त्यांच्यासाठी तीन प्रशिक्षक देखील नेमण्यात आले आहे. विशेष म्हणजे या सर्व मुलींच्या जेवणाची व्यवस्था स्वतः भाग्यश्रीची आई पूजा फंड या सांभाळतात.


मुलींच्या कुस्तीला सोन्याचे दिवस


कोल्हापूर येथे झालेली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अधिकृत आहे किंवा नाही यावरून बराच वाद झाला , राजकारण रंगलं... मात्र अशा स्पर्धामुळे मुलींच्या कुस्तीला सोन्याचे दिवस आले आहेत...खेळावरून राजकारण होऊ नये अशी अपेक्षा भाग्यश्री आणि तिच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. मुलगी म्हणजे परक्याचे धन अशी समाजात आजही समज आहे. त्यामुळे खेळ किंवा इतर करीयर बाबतीत मुलींना जास्त प्राधान्य दिले जात नाही. पण भाग्यश्री, धनश्रीसाठी आयुष्याची पुंजी लावणाऱ्या हनुमंत फंड यांचा आदर्श घेऊन इतरांनी मुलींना प्राधान्य देणं गरजेचं आहे.