Shirdi Saibaba : साईबाबा संस्थानला (Shirdi Saibaba) भक्त नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे दान करत असतात. प्रत्येकच भक्त आपल्याला शक्य त्या परीने साईबाबांची सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातच देशातली वाहन क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेली कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra And Mahindra) उत्पादित होणारी पहिली गाडी साईचरणी (Saibaba Mandir) दान करत असते. नुकतेच महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपच्या वतीने पंधरावी कार साईचरणी दान करण्यात आली आहे.
श्री साईबाबा संस्थान (Shirdi Sansthan) विश्वस्त व्यवस्था, शिर्डीला महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समुहाकडून 31 लाख किंमतीची XUV 700 AX7 D AT या श्रेणीतील गाडी देणगी स्वरुपात प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे यांनी दिली. शनिवार 22 जुलै रोजी महिंद्रा अँड महिंद्राचे प्रेसिडेंट विजय नाकारा (Vijay Nakara) यांनी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे यांच्याकडे संबंधित गाडीची चावी सुपूर्द केली. या गाडीची महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समुहाचे प्रेसिडेंट विजय नाकारा व संस्थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समुहाचे झोनल सर्व्हीस हेड अनिल राय, संस्थानचे कार्यकारी अभियंता बी.डी. दाभाडे, वाहन विभाग प्रमुख अतुल वाघ, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, प्र.जनसंपर्क अधिकारी तुषार शेळेके आदि उपस्थित होते.
साईबाबा संस्थानच्या इतिहासात आत्तापर्यंत महिंद्रा ग्रुपने 14 वाहन दान स्वरुपात दिल्या आहेत. आता महिंद्रा कंपनीने आपली एक्सयूव्ही 700 या मॉडेलमधली ऑटोमॅटिक मॉडेल कार दान स्वरुपात साई चरणी दिली आहे. या गाडीची ऑन रोड किंमत 31 लाखांच्या जवळपास असल्याचे सांगितलं जातं आहे. महिंद्रा कंपनीचे प्रेसिडेंट विजय नाकारा यांच्या हस्ते गाडीच्या विधिवत पूजा करुन चाव्या साई संस्थांनकडे सुपूर्द करण्यात आल्या. साईबाबा संस्थानचे वतीने प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे यांचे हस्ते विजय नाकारा यांचा श्रींची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला.
आतापर्यंत चौदा कार दान
भारत देशातील उद्योगपती महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक जगदीशचंद्र महिंद्रा आणि कैलासचंद्र महिंद्रा यांनी साईचरणी ही कार भेट दिली आहे. त्यांनी आतापर्यंत साईबाबा संस्थानला विविध प्रकारची 14 वाहने भेट दिली आहेत. साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीला महिंद्रा अॅण्ड महिंद्रा उद्योग समुहाकडून यापूर्वी व्हायोजर, बोलेरो, स्कॉर्पिओ, झायलो, लोगान, मॅक्सिमो, युवराज (ट्रॅक्टर), एक्सयूव्ही 500, एक्सयूव्ही 300, मराझो, थार असे विविध श्रेणीतील एकूण 12 चार चाकी वाहने आणि 2 दुचाकी वाहने देणगी स्वरुपात प्राप्त झालेले आहेत. आणि आता महिंद्रा एक्सयूव्ही 700 ए.एक्स 7 अेटी या श्रेणीतील जवळपास 31 लाख किंमतीची गाडी देणगी स्वरुपात दिली.
हेही वाचा :
Shirdi Sai Baba : साईचरणी गुरूपौर्णिमा उत्सवात कोट्यवधींची गुरूदक्षिणा; तीन दिवसांत सात कोटींचं दान