संगमनेर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections) बिगुल वाजल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून जयश्री थोरात आणि सुजय विखे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. जयश्री थोरात (Jayshree Thorat) यांनी 'माझ्या बापावर टिका कराल, तर खबरदार', असे म्हणत सुजय विखेंवर (Sujay Vikhe) निशाणा साधला होता. यांनतर सुजय विखे यांनी तालुक्यातील जनतेने तुमचा चाळीस वर्षांचा कारभार पाहिला आहे. तालुक्याचा बाप कोण हे येत्या निवडणुकीत जनता दाखवून देईल, असे प्रत्युत्तर दिले होते. आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सुजय विखेंवर हल्लाबोल केलाय. बाप शब्दानंतर आता संस्कृती व दहशत शब्दावरून थोरात-विखेंमध्ये राजकरण रंगण्याची चिन्ह आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर विधानसभा मतदारसंघात (Sangamner Vidhan Sabha Constituency) काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांनी युवा संवाद यात्रा सुरू केली आहे. लेकीच्या युवा संवाद यात्रेत वडील बाळासाहेब थोरात यांनी हजेरी तुफान फटकेबाजी केली. भाजप नेते सुजय विखे यांच्या वाढलेल्या संगमनेर दौऱ्यावरून बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखेंवर निशाणा साधला.
संगमनेर तालुक्यात मी दहशत केली यांचं उदाहरण दाखवा
बाळासाहेब थोरात म्हणाले की, काही मंडळी आपल्या तालुक्यात प्रचार करताय. या तालुक्यात दहशत आहे. विकासच झाला नाही, असे आरोप आरोप करताय, त्यांच्या तालुक्यात जाऊन एकदा परिस्थिती पाहा. संगमनेर तालुक्यात मी दहशत केली याच एक तरी उदाहरण दाखवा. तिकडे विरोधात बोलला की, तंगड्या तोडल्या जातात, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखेंवर हल्लाबोल केला.
चोराच्या उलट्या बोंबा
आपल्या कारखान्यात कंट्री लिकर होत नाही, तिकडे सगळं चालतं. त्यामुळे सगळं फुकट मिळतं. तुमच्याकडे खासदार, आमदार, मंत्री, केंद्रीय मंत्री झाले आणि एमआयडीसी काढायला साठ वर्षे लागले? असा सवाल देखील बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला. निवडणुकीनंतर ही एमआयडीसी देखील गुंडाळून ठेवली जाणार आहे. माझ्यावर इकडे येऊन आरोप करतात. मात्र, या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. तुम्ही एकदा खासदार झाले, दुसऱ्यांदा लोकांनी तुम्हाला घरी पाठवलं, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखेंना डिवचले.
दहशतमुक्त वातावरणासाठी माझा प्रयत्न
मी आठ वेळा आमदार झालोय. आपण वैचारिक लोक आहोत. अशा प्रकारची कीड आपल्या तालुक्यात येऊ द्यायची नाही. निळवंडे ऐवजी महाडादेवी करण्यासाठी या शेजारच्यांनीच आंदोलन केलं होतं. वांजोट्या बाईला मुलगा होईल पण निळवंडे होणार नाही, असं त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं. मी ही शिर्डीत जातो मात्र तिथलं वातावरण चांगलं करण्यासाठी जातो. दहशतमुक्त वातावरणासाठी माझा प्रयत्न आहे. आपल्याला काम करावे लागेल. आपल्याला जपायचं आहे. 23 तारखेला महाराष्ट्रातील सर्वात मोठा विजय आपल्याला घडवून आणायचा आहे, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.
आणखी वाचा