Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून अजूनही तिढा कायम आहे. महायुतीकडून आतापर्यंत 182 उमेदवारांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून 65 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र अजूनही जागा वाटपाच्या अंतिम फॉर्म्युल्यावर दोन्ही आघाड्यांमध्ये एकमत झालेलं नाही. अजूनही महाविकास आघाडीकडून जागा वाटपांचा काथ्याकूट सुरूच आहे, तर महायुतीचा दिल्लीमध्ये बैठकांवरती बैठकांचा सिलसिला सुरू आहे. महायुतीमध्ये अजूनही 106 जागांवरती एकमत झालेलं नाही.


काँग्रेसकडूनही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर? 


ही बाब एका बाजूने असताना दुसऱ्या बाजूने मुख्यमंत्रीपदावर महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल अजूनही एकमत झालेलं नाही. महायुतीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर केलेला नाही. दरम्यान, आता काँग्रेसकडूनही मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून चर्चा सुरू झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जर आमदारांच्या संख्याबळात काँग्रेसच्या सर्वाधिक जागा राहिल्यास काँग्रेसकडून सुद्धा मुख्यमंत्रीपदावर दावा केला जाऊ शकतो, असे सातत्याने बोलले जात आहे. महाविकास आघाडीकडून अजून कोणत्याही चेहऱ्याला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून समोर आणण्यात आलेलं नाही. त्यामुळे काँग्रेसकडून आता ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा आहे. बाळासाहेब थोरात हे प्रदेश काँग्रेसमधील संयमी नेतृत्व म्हणून पाहिलं जातं. गेल्या चार दशकांपासूनचा त्यांचा काँग्रेससोबतचा प्रवास हा अत्यंत संयमी असाच राहिला आहे. त्यामुळे तेच मुख्यमंत्रीपदाचे चेहरा होऊ शकतात, असं बोललं जात आहे.


थोरातांच्या नावावर नाना पटोले काय म्हणाले? 


बाळासाहेब थोरात यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी समोर आल्याची चर्चा रंगल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मला वाटतं मुख्यमंत्रीपदाची चर्चा नाही, राज्य वाचवण्यासाठी आम्ही काम करत आहोत. आम्ही एकमेकांसोबत काम करत आहोत. लोकांमधून आमदार निवडून आल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचं ठरवलं जाईल. मुख्यमंत्रीपदाची चर्चा थांबवली पाहिजे, असे त्यांनी सांगितलं. दरम्यान, महायुतीच्या मुख्यमंत्रीपदावरून नाना पटोले यांनी खोचक शब्दांमध्ये टोला लगावला. चंद्रकांत पाटील यांच्याकडून आलेल्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, चंद्रकांत पाटीलयांनी महायुतीकडे मुख्यमंत्रीपदासाठी नाव सांगितला आहे का? नाही. हे डाकू लोक आहेत, अशी टीका त्यांनी केली. 


ठाकरेंची मागणी अन् जयंतरावांचे नाव समोर!  


महाविकास आघाडीमध्ये सुद्धा मुख्यमंत्रीपदाची चर्चा सर्वाधिक ठाकरे गटाकडून केली जात आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी जाहीरपणे शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी सातत्याने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, माझा त्याला खुला पाठिंबा असेल असं त्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर शरद पवार यांनी पक्षाच्या शिवसन्मान यात्रेच्या समारोपात बोलताना इस्लामपुरात जयंत पाटील यांना अप्रत्यक्षरीत्या मुख्यमंत्रीपदासाठी उचित चेहरा असल्याचे म्हटलं होतं. त्यामुळे ठाकरे यांच्या मागणीनंतर शरद पवार यांनी जयंतरावांचा चेहरा समोर आणल्याचे चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली होती. त्यानंतर ठाकरे गटाकडून सुद्धा या मागणीला खोचक प्रतिक्रिया देण्यात आली होती.