अहमदनगर : शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात (Shevgaon-Pathardi Assembly Constituency) भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांच्या विरोधात भाजपचेच प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे (Arun Munde) यांनी गंभीर आरोप केलेत. यामुळे अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपने मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांबाबत पक्षातील पदाधिकाऱ्यांची काय मते आहेत? हे जाणून घेण्यासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून विजय साने यांना पाठवले होते. त्यावेळी बंद पाकिटात पदाधिकाऱ्यांनी आपले मतं द्यायची होती, मात्र, विद्यमान आमदारांनी जे लोक भाजपमध्ये नाहीत, अशा लोकांना त्या बैठकीला पाठवले असल्याचे अरुण मुंडे यांनी म्हटले आहे.
राजळेंच्या पायाखालची जमीन सरकलीय : अरुण मुंडे
या बैठकीत अरुण मुंडे समर्थकांनी आक्षेप घेतल्याने काही काळ गोंधळ देखील उडाला होता. दरम्यान अरुण मुंडे यांनी आपल्याच पक्षाच्या विद्यमान आमदारांवर टीका करताना "पक्षाने तुम्हाला दोन वेळा आमदार केलं आहे आता तुम्ही थांबलं पाहिजे", तुम्ही म्हणता की तिकीट फिक्स, कामाला लागा! तर त्यांचे (मोनिका राजळे) तिकीट काही फिक्स झालेलं नाही त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, अशी टीका अरुण मुंडे यांनी केली आहे.
मोनिका राजळेंच्या अडचणीत वाढ?
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्ष वेगळाच विचार करेल आणि मला किंवा गोकुळ दौंड यांनाच तिकीट मिळेल, असा विश्वासदेखील अरुण मुंडे यांनी व्यक्त केलाय. त्यामुळे भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना स्वपक्षातूनच विरोध होऊ लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मोनिका राजळे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हर्षदा काकडे विधानसभेसाठी इच्छुक
दरम्यान, अहमदनगरच्या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी कुठल्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. हर्षदा काकडे (Harshada Kakade) यांच्या भूमिकेने भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. एकेकाळी भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या हर्षदा काकडे यांना 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही, मात्र आता मिळेल त्या पक्षाकडून उमेदवारी करायची किंवा अपक्ष निवडणूक लढवायची, असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
सुजय विखे यांच्या संगमनेरमधून उमेदवारीबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे विधान, म्हणाले....