Cabinet Decision मुंबई : विधानसभेची (Vidhan Sabha Election) आचारसंहिता कोणत्याही क्षणाला लागू शकते. त्यामुळे महायुती सरकारने त्यापूर्वी जणू निर्णयांचा धडाका सुरू केल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.10) राज्याची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. विशेष म्हणजे एकाच आठवड्यात ही दुसऱ्यांदा घेतलेली राज्य मंत्रिमंडाळाची (Cabinet Meeting) बैठक आहे. या बैठकीत 33 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान विधानसभेपूर्वी केंद्रानं देखील आणखी एक मोठा निर्णय घेत राज्यातील अहमदनगर जिल्‍ह्याचे नाव 'अहिल्‍यानगर' असे नामांतर करण्याची मागणीला मोदींच्या मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत होत असल्याचे चित्र आहे. तर प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास दोन वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाखाच्या दंडाची तरतूदही आज राज्य मंत्रिमंडाळाच्या बैठकीत करण्यात आली आहे.


नामांतरास पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात मंजुरी


अहमदनगर जिल्‍ह्याचे नाव 'अहिल्‍यानगर' असे करण्याची मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून होत होती. यादरम्यान राज्य सरकारने या मागणीच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर अखेर केंद्र सरकारने देखील राज्य सरकारकडून पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. अहिल्यानगर नावाबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. मात्र, हा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी असल्यामुळे अहिल्यानगर होणार का नाही? याबाबत संभ्रम अवस्था असताना काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत औरंगाबाद हायकोर्टामध्ये अहमदनगरचे नाव बदलू नये, म्हणून याचिका दाखल केली होती. मात्र आता केंद्र सरकारने अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्यास मंजुरी दिल्याने ही चर्चा थांबणार आहे. दरम्यान राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ट्विट करत या निर्णयाचे स्वागत करत केंद्र सरकारच्या आभार मानले आहेत.


गोपीचंद पडळकरांनी केली होती मागणी 


दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून सतत अहमदनगरचे 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' असे नामांतर करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, गतवर्षी चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या 298 व्या जयंती सोहळ्यात बोलतांना देखील त्यांनी ही विनंती केली होती. याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नामांतराची घोषणा केली होती. 


शरद पवारांसमोर मुस्लीम समाजाकडून "अहिल्यानगर" नावाला विरोध


मात्र, दुसरीकडे नगरच्या नामांतराचा प्रश्न ऐरणीवर आला असताना अहमदनदरमध्ये मुस्लीम समुदायाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कडे शहराचे नाव "अहिल्यानगर नको, अहमदनगर हवं", अशी मागणी केली होती. मधल्याकाळात शरद पवार हे अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असताना जामखेड येथील काही मुस्लीम बांधवांनी त्यांचा सत्कार केला. मात्र यावेळी मुस्लीम बांधवांनी आम्हाला "अहिल्यानगर" नको तर "अहमदनगर"च पाहिजे, अशा घोषणाही त्यावेळी त्यांनी दिल्या. त्यामुळे पुन्हा एकदा नगरच्या नामांतराचा प्रश्न ऐरणीवर आला होता. संपूर्ण नगर जिल्ह्यातील मुस्लीम समाजाने "अहिल्यानगर" नावाला विरोध केला असल्याची चर्चा होती. तेव्हाचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर देखील चांगलेच  व्हायरल झाले असून या व्हिडिओची राजकीय वर्तुळात देखील जोरदार चर्चा रंगली होती. मात्र आता सरकारने अखेर निर्णय घेतलं असल्याने या मुद्यावर आता तरी पडदा पडेल, अशी शक्यता आहे.   


आणखी वाचा 


मोठी बातमी! गड किल्ल्यांवर दारू, ड्रग्जचे सेवन केल्यास 2 वर्षे शिक्षा, 1 लाख रुपये दंड; मंत्रिमंडळ निर्णय