शिर्डी : अहमदनगर (Ahmednagar News) जिल्ह्यातील पाथर्डी शेवगाव मतदारसंघासाठी (Pathardi Shevgaon Constituency) भाजपच्या (BJP) इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असताना गोंधळ उडाल्याचा प्रकार घडला होता. या पाठोपाठ आता काँग्रेस (Congress) पक्षाची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेसच्या विधानसभा निहाय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असताना दोन गटात गोंधळ उडाल्याने खळबळ उडाली.
लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) वारे वाहू लागले आहेत. विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सामना रंगणार आहे. अनेक पक्षांकडून सध्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत.
काँग्रेसची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर
आज श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात (Shrirampur Assembly Constituency) काँग्रेसच्या विधानसभा निहाय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू होत्या. या मुलाखती सुरु असताना दोन्ही गटात गोंधळ उडाला. यामुळे काँग्रेस पक्षाची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे यांचा धिक्कार करत काँग्रेसच्या दुसऱ्या गटाकडून घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेसचे पक्ष निरीक्षक आ. मुज्जफर हुसेन यांच्यासमोर काँग्रेसच्या दोन गटात गोंधळ उडाला. काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे यांच्याविरोधात काँग्रेसचे इच्छुक उमेदवार हेमंत ओगले यांच्या गटाकडून शक्तीप्रदर्शन करत घोषणाबाजी करण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
भाजपच्या दोन गटांमधील अंतर्गत कलह समोर
दरम्यान, 1 ऑक्टोबरला पाथर्डी शेवगाव मतदारसंघासाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत होत्या. नाशिकचे प्रभारी आणि अहमदनगर जिल्ह्याचे निवडणूक निरीक्षक म्हणून विजय साने हे या मुलाखती घेत होते. यावेळी विद्यमान आमदार मोनिका राजळे पक्षपाती करत असल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीत खोटे पदाधिकारी दाखवून मत नोंदणीचा प्रयत्न केल्याने दोन गटात चांगलाच वाद उडाल्याचे दिसून आले. तर काही पदाधिकाऱ्यांना मुलाखतीबाबत कळवण्यातच आले नसल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुलाखती सुरू असताना गोंधळ झाल्याने काही काळ विजय साने यांनी कामकाज थांबवले होते. या गोंधळामुळे भाजपच्या दोन गटांमधील अंतर्गत कलह बाहेर आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या