अहमदनगर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) घोषणा झाल्यानंतर कोपरगाव विधानसभा मतदारसंघ (Kopargaon Vidhan Sabha Constituency) चांगलाच चर्चेत आला आहे. कारण या मतदारसंघाची जागा महायुतीत अजित पवार गटाला सुटली होती. मात्र भाजप नेते विवेक कोल्हे (Vivek Kolhe) निवडणुकीसाठी इच्छुक असल्याने महायुतीत जोरदार रस्सीखेच पहायला मिळाली. अखेर कोल्हे कुटुंबीयांनी निवडणूक माघार घेतल्याने अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांचा मार्ग मोकळा झाला. आता आशुतोष काळे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाने (NCP Sharad Pawar Group) निष्ठावान कार्यकर्त्याला संधी दिली आहे. मागील निवडणुकीत काळेंचा प्रचार करणारा कार्यकर्ता आता त्यांच्या विरोधात निवडणूक लढत आहे. 


राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होत असून कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून कोल्हे परिवाराने माघार घेतल्यानंतर शरद पवारांनी विद्यमान आमदार आशुतोष काळे विरोधात सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिलीय. संदीप वर्पे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वर्पे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शरद पवारांना अहिल्यानगर जिल्ह्यात अजून एक निलेश लंके सापडला, अशी चर्चा आता कोपरगाव मतदारसंघात रंगताना दिसत आहे. 


कोपरगावात घड्याळ विरुद्ध तुतारी


मागील विधानसभा निवडणुकीत संदीप वर्पे या कार्यकर्त्याने विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना निवडून आणण्यासाठी प्रचार केला होता. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उत्तरनगर जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे हे आशुतोष काळे यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरणार आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात घड्याळ विरुद्ध तुतारी ही लढत पाहायला मिळणार आहे. 


मतदार मला निवडून देणार : संदीप वर्पे


कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संदीप वर्पे म्हणाले की, पक्ष स्थापनेपासून ज्या पक्षात निष्ठेने काम केलं त्या पक्षाने नोंद घेतली याचा आम्हाला आनंद आहे. मागील निवडणुकीत काळे यांच्या विजयात माझा खारीचा वाटा आहे. मात्र परिस्थिती पाहून त्यांनी त्यांचा निर्णय बदलला. मागील वेळी शरद पवार साहेबांची सभा झाली नसती तर उमेदवार विजयी झालाच नसता. आज ज्यांच्याबरोबर ते गेले ते त्यावेळी कोपरगावात एक मत मागायला देखील आले नव्हते. लोक म्हणतात दोन राष्ट्रवादीत ही लढत आहे. मात्र मतदारसंघाला माहिती आहे की खरी राष्ट्रवादी कोणाची आहे. माझ्या विजयाचं गणित कोपरगावच्या जनतेवर अवलंबून आहे. शरद पवार हाच आमचा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही डगमगत नाही. शरद पवारांसह राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठ नेते माझ्यासाठी प्रचाराला येतील याची मला खात्री आहे. मतदार मला निवडून देतील याची मला खात्री असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 


आणखी वाचा