अहमदनगर : एकीकडे आरोपांवरून आरोप होत असलेल्या वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांच्या आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांची पाठराखण करण्यासाठी आख्खं गावच पुढे आलं आहे. मनोरमा खेडकर यांचे मूळ गाव असलेले पाथर्डी तालुक्यातील भालगाव ग्रामस्थ पुढे आले आहेत. मनोरमा खेडकर यांची नाहक बदनामी केली जात असून हे थांबवले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा भालगावच्या ग्रामस्थांनी दिला.
काय म्हटलंय निवेदनात?
भालगावच्या ग्रामस्थांनी याबाबत अहमदनगरचे जिल्हाधिकारी तसेच पोलिस प्रशासनाला निवेदन पाठवले आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की, मनोरमा खेडकर या भालगावच्या सरपंच होत्या तेव्हा त्यांनी गावाचा विकास करत कायापालट केलाय. मात्र मुळशी प्रकरणात त्यांची नाहक बदनामी सुरु आहे. मुळशी प्रकरणात केवळ एकच बाजू जाणीवपूर्वक दाखवण्यात येत आहे आणि खरी बाजू लपवण्यात येत आहे.
5 जून 2023 रोजी साधारणः दुपारच्या वेळी मुळशी परिसरातील काही गुंड प्रवृतीच्या लोकांनी हातात काठ्या, कमरेला धारदार हत्यार घेऊन मनोरमा खेडकर यांच्यावर भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तब्बल 20 मिनिट हा धिंगाणा सुरू होता.
मनोरमा खेडकर यांच्या सुरक्षारक्षकांनी जमाव हटविण्याचा प्रयत्न केला. मात्र जमाव हटत नव्हता. तेव्हा मनोरमा खेडकर यांनी स्वः संरक्षणासाठी स्वतः जवळचे परवाना असलेले पिस्तूल बाहेर काढले. तेव्हा कुठे जमाव बाजूला झाला आणि मनोरमा खेडकर यांचा जीव वाचला. या घटनेची ही खरी सत्यता आहे. मात्र सध्या खेडकर कुटुंबाबाबत जाणीवपूर्वक दहशत पसरवत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत.
या घटनेची पारदर्शक चौकशी होण्यासाठी गावातील शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत असं निवेदनात म्हटले आहे. सोबतच मनोरमा खेडकर यांची बदनामी थांबवावी, अन्यथा भालगाव गावातून मुंबईपर्यंत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
मनोरमा खेडकरांच्या अडचणी वाढल्या
मनोरमा खेडकरांवर पुण्यातील पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. त्या अनुषंगाने पौड पोलिसांचे एक पथक बाणेर रस्त्यावर असलेल्या खेडकर यांच्या घराची पाहणी करून गेलं. खेडकर कुटुंबाने त्याला कुठलाही प्रतिसाद न दिल्याने पोलिस निघून गेले. त्यामुळे पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मनोरमा खेडकर यांनी काही दिवसांपूर्वी हातात पिस्तूल घेऊन एका शेतकऱ्यांवर दमदाटी केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे. तसेच पिस्तुलाचं लायसन्स रद्द का करण्यात येऊ नये अशा आशयाची नोटीस बजावली आहे. त्याचसोबत मनोरमा खेडकरांनी धमकी देताना वापरलेल्या पिस्तुलाचे लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.
ही बातमी वाचा: