अहमदनगर : श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील बेलवंडी (Belwandi) गावात पडलेल्या विजेच्या तारांचा शॉक (Electric shock) लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर दोन शेळ्यादेखील दगावल्या आहेत. संभाजी किसन वाळके (Sambhaji Kisan Walke) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  


याबाबत अधिक माहिती अशी की, बेलवंडी गावातील वाळके वस्तीवरील शेतकरी संभाजी किसन वाळके हे शेळ्या घेऊन नदीच्या कडेला शेळ्यांना चरायला घेऊन गेले होते. नदीच्या कडेला असलेल्या शेतात दोन विद्युत पोल पावसामुळे (Rain) कोसळले होते. विजेचे पोल पडून सुमारे 18 तास उलटले तरी देखील त्यातील विद्युत पुरवठा सुरूच होता. 


शेतकरी अन् दोन शेळ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू 


शेळ्या चरत असताना विजेच्या तारांजवळ गेल्याने त्यांना विजेचा शॉक लागला. यावेळी संभाजी वाळके हे शेतकरी त्यांच्या जवळ त्यांनादेखील विजेचा शॉक लागला. घटनेची माहिती नातेवाईकांना समजताच त्यांनी तात्काळ जवळच्या विद्युत ट्रान्सफॉर्मरचा विद्युत पुरवठा खंडित केला. परंतु तोपर्यंत दोन शेळ्या आणि संभाजी वाळके यांचा मृत्यू झाला होता. 


शेतकऱ्याच्या मृत्यूस महावितरणच जबाबदार, ग्रामस्थांचा आरोप 


त्यानंतर घटनास्थळी बेलवंडी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शोकाकुल वातावरणात संभाजी वाळके यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान शेतकऱ्याच्या मृत्यूस महावितरणच जबाबदार असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी महावितरणचा (Mahavitaran) निषेध व्यक्त केला आहे. 


अहमदनगरमध्ये पावसाची जोरदार हजेरी


दरम्यान, अहमदनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरूच आहे. शुक्रवारी नगर व पाथर्डी तालुक्यात पावसाने मुसळधार हजेरी लावली. नगर तालुक्यातील जेऊर परिसरात जोरदार पाऊस कोसळला. पावसामुळे शेतात पाणी साचून शेतांना तळ्याचे स्वरूप आल्याचे दिसून आले. खारोळी नदीवरील बहुतांशी बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. मात्र सततच्या पावसामुळे पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या 


नाशकात जोर'धार', राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या गलथान कारभारामुळे उड्डाण पुलावरून रस्त्यावर कोसळले धबधबे


Nashik Rain : झाडे कोसळली, 25 कांदाशेड उद्ध्वस्त, दोघांचा दुर्दैवी अंत; नाशिकला पावसानं चांगलंच झोडपलं