Eknath Shinde : अहिल्यादेवींचे योगदान पाहता यापुढे त्यांचा उल्लेख अहिल्या'बाई' असा करण्याऐवजी अहिल्या'देवी' असा करावा, यासाठी शासन जीआर काढेल. सर्व सरकारी दस्तावेजांमध्ये अहिल्याबाईऐवजी ‘अहिल्यादेवी’ असा उल्लेख केला जाईल, तसेच धनगर समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन केले जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ते आज अहमदनगरमधील चौंडी येथे बोलत होते. धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असला तरीही धनगर समाजाला आदिवासी समाज बांधवांप्रमाणे सारे लाभ मिळतील, शिष्यवृत्ती, वसतीगृह अशा सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असेही यावेळी स्पष्ट केले.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 वा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने राज्यभरातून अहिल्याप्रेमी अहमदनगरच्या चौंडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी दाखल झाले होते.   पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 व्या जयंती उत्सवासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री अतुल सावे, मंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार संजय शिरसाट, आमदार श्रीमती मोनिकताई राजळे, अण्णासाहेब डांगे, दत्तात्रय भरणे, सुरेश धस, राम शिंदे, गोपीचंद पडळकर तसेच विविध पक्षांचे मान्यवर पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व अहिल्यादेवींचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


एकनाथ शिंदे काय म्हणाले ? 


अहिल्यादेवींचे योगदान पाहता यापुढे त्यांचा उल्लेख अहिल्या'बाई' असा करण्याऐवजी अहिल्या'देवी' असा करावा यासाठी शासन जीआर काढेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असला तरीही धनगर समाजाला आदिवासी समाज बांधवांप्रमाणे सारे लाभ मिळतील, शिष्यवृत्ती, वसतीगृह अशा सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असेही यावेळी स्पष्ट केले. वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा अर्ज भरून झाल्यावर तिथल्या घाटाला भेट दिली तिथे अहिल्यादेवींचा मोठा पुतळा आहे, मी त्यांच्यापुढे नतमस्तक झालो. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव संपूर्ण देशभरात मोठ्या अभिमानाने घेतले जाते. पुढच्या वर्षी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती आहे. ही जयंती राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. 






गेल्यावर्षी मी इथे आलो तेव्हा मी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर करेन असे सांगितले होते. जे बोललो ते मी खरे करून दाखवले आहे त्यामुळे वचनाला जागणारे हे सरकार आहे. त्यामुळेच औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामकरण करून दाखवले असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.