अहमदनगर : अकोले तालुक्यातील पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सांदण व्हॅलीत पर्यटनासाठी आलेल्या पर्यटक मुलीचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास या परिसरात निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी आलेल्या तरुणींच्या समूहातील एका तरुणीचा सांदण व्हॅली पाहत असताना पाय घसरला. त्यामुळे दगडावर डोके आपटून तिचा दुर्दैवी मृत्यू (Bhandardara Sandan Valley Accident) झाला. सदरची तरुणी मुंबईतील दहिसरची आहे. ऐश्वर्या खानविलकर (वय 29 वर्षे) असं तिचं नाव आहे.


सलग सुट्ट्यांमुळे सध्या राज्यातील सर्व पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल असल्याचं चित्र आहे. त्यामुळे भंडारदरा धरण परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. पाणलोट क्षेत्रातील साम्रदजवळील सांधण दरीत ही घटना घडली. या घटनेत मुंबई येथून भंडारदरा परिसरात पर्यटनासाठी मुंबईतील तरुणींचा समूह सकाळीच दाखल झाला होता. भंडारदरा धरणाचा परिसर पाहिल्यानंतर ते सर्वजण सांधन दरीत गेले. 


निसर्गाचा चमत्कार न्याहाळीत असतानाच त्यातील ऐश्वर्या खानविलकर या तरुणीचा एका खडकावरुन पाय घसरला. त्यामुळे ती सुमारे दहा ते पंधरा फूट खाली पडली. दुर्दैवाने एका खडकावर तिचे डोके आपटल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. मयत तरुणीचा मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालयाकडे पाठवण्यात आला आहे.