अहमदनगर : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election) वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्ष आणि इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. अहमदनगरच्या (Ahmednagar) श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून (Shrigonda Vidhan Sabha Constituency) जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार (Annasaheb Shelar) यांनी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे येथील प्रस्थापितांची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे. 


श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडीचे अण्णासाहेब शेलार यांनी आतापर्यंत श्रीगोंद्यातील विद्यमान भाजप आमदार बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute), माजी आमदार राहुल जगताप (Rahul Jagtap), काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार (Ghanshyam Shelar), अनुराधा नागवडे (Anuradha Nagwade) यांना नेहमीच राजकारणात मदत केली आहे. 


आता सर्वांनी मला साथ द्यावी


अनेकांच्या आमदारकीच्या निवडणुकीत शेलार यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. मात्र आता थेट अण्णासाहेब शेलार यांनीच निवडणूक लढवण्याचे ठरवल्याने श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीचे समीकरणे बदलणार आहेत. या आधी मी त्याग करून सर्वांना मदत करत आमदार केले, आता सर्वांनी मला साथ द्यावी, अशी भूमिका शेलारांनी व्यक्त केलीये. 


आमचा पक्ष ठरलाय, पण...


दरम्यान, मधल्या काळात अण्णासाहेब शेलार यांचे चिरंजीव बेलवंडीचे सरपंच ऋषिकेश शेलार हे विधानसभा निवडणूक लढवतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. याबाबत विचारले असता आम्ही बाप-लेक चर्चा करू आणि जनतेचा देखील विचार घेऊ, मगच निर्णय घेऊ असे शेलार यांनी म्हटले आहे. तसेच आतापर्यंत वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांना मदत करून आमदार केले, आता आमचा पक्ष ठरला आहे. पण, लगेच त्याबाबत सांगणार नाही, असे शेलार यांनी म्हटले आहे. 


शरद पवार गटाकडून अकोलेतून अमित भांगरेंना उमेदवारी


दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघातून अमित भांगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अमित भांगरे (Amit Bhangre) यांच्या पाठीशी उभे राहा, या ठिकाणचे अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे (Kiran Lahamate) यांना खाली बसवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अकोलेतील शेतकरी मेळाव्यामध्ये केले होते. त्यामुळे अकोले विधानसभा मतदारसंघातून अमित भांगरे विरुद्ध किरण लहामटे, अशी लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


रोहित पाटलांनंतर विधानसभेसाठी पवारांकडून दुसरा तरूण उमेदवार जाहीर, राष्ट्रवादीचे तीन उमेदवार ठरले


मोठी बातमी : विधानसभेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर, जागावाटपाआधीच मोठी घोषणा