Ahmednagar Water Shortage : जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने जोरदार हजेरी लावली. राज्यभर सर्वदूर वरुणराजा बरसला. नदी, नाले तुडूंब वाहू लागले. पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणंही प्लसमध्ये आली. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस (Rain) झाला आहे. जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात म्हणजेच अकोले (Akole) तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मात्र असं असूनही जिल्ह्यात अजूनही 16 टँकरने (Tanker) पाणीपुरवठा सुरु आहे. 


जिल्ह्याचा विचार केला तर गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्याला यंदा पाणी टंचाईच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवल्या नाहीत. त्यामुळे उन्हाळ्यात केवळ 41 टँकरने जिल्ह्यात पाणीपुरवठा सुरु होता. हे सर्व टँकर शासकीयच होते. जिल्ह्यात जूनच्या मध्यानंतर पावसाला सुरुवात झाली. जून अखेर जिल्ह्यात 113 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अकोले तालुक्यात जास्त पाऊस झाला. सरासरीच्या 120 टक्के पाऊस पडला. सरासरीमध्ये पावसाचे प्रमाण अधिक दिसत असले तरीही अजून काही गावांमध्ये समाधानकारक पाऊस झाला नाही, त्यामुळे त्या भागात अद्यापही टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.


कोणत्या तालुक्यातील किती गावांना टँकरने पाणीपुरवठा?
संगमनेर तालुक्यातील 15 गावं आणि 27 वाड्यांना सध्या 11 टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. दररोज 36 खेपा या गावांमध्ये होतात. त्याद्वारे 20 हजार नागरिकांची तहान भागवली जाते. तर नगर तालुक्यात चार गावं आणि सात वाड्यांना दोन टँकरने पाणीपुरवठा केला जातो, साडेनऊ खेपा तिथे होतात. पारनेर तालुक्यातील पाच गावं आणि 22 वाड्यांना एका टँकरने 20 खेपा केल्या जातात. तर श्रीगोंदा तालुक्यातील दोन गावं आणि 16 वस्त्यांना दोन टँकरद्वारे साडेपाच खेपांतून पाणीपुरवठा होत आहे.


जूनअखेर अहमदनगर जिल्ह्यात 113 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती तर जून ते आजपर्यंत 206 मिलिमीटर पाऊस झाला आहे. असं असलं तरी हा पाऊस केवळ नगरच्या उत्तर भागात झाला आहे. दक्षिण नगर जिल्ह्यात अद्यापही जोरदार पाऊस झालेला नाही. मात्र, उत्तर भागात पाऊस झाला असतानाही सर्वाधिक टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळी ही उत्तरेकडेलीच संगमनेर तालुक्यात आली आहे.