Ahmednagar News : अहमदनगरच्या (Ahmednagar) शिवसेनेत अखेर फूट पडली आहे. शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे (Anil Shinde) यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे (Shashikant Gade) यांचे चिरंजीव नगरसेवक योगीराज गाडे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक आणि कार्यकत्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात मुंबई येथे जाहीर प्रवेश केला. नगरसेवक संग्राम शेळके, बसपाचे नगरसेवक अक्षय उनवणे, माजी नगरसेवक दिलीप सातपुते, अनिल लोखंडे, काका शेळके, रमाकांत गाडे, सुभाष लोंढे, भिंगार कॅन्टोमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष प्रकाश फुलारी यांनी मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांना समर्थन दिलं आहे.


शिवसेनेचे नगरचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकर यांच्याबाबत शहरातील अनेक नगरसेवकांसह काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नेहमीच नाराज जाहीर केली आहे. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेही वारंवार तक्रारी करण्यात आलेल्या आहेत मात्र तरीही त्यांना हटविण्यात आले नाही. म्हणूनच आम्ही शिंदे गटात सामील झाल्याचं काका शेळके यांनी सांगितले. 


जिल्हाप्रमुखांचे कुटुंबीय शिंदे गटात


विशेष म्हणजे शिवसेनेचे दक्षिण जिल्हा शशिकांत गाडे यांचे बंधू रमाकांत गाडे आणि शशिकांत गाडे यांचा मुलगा योगीराज गाडे हे देखील शिंदे गटात सामील झाल्याने जिल्ह्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. दोनच दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्षांच्या हॉटेलमध्ये संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी नगरचे शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत आहेत असं सांगण्यात आलं होतं. मात्र, त्या बैठकीला नगरसेवक केवळ शरीराने उपस्थित होते मनाने ते शिंदे गटात आहेत हे आता स्पष्ट होत आहे. यानंतर देखील अनेक शिवसेना नगरसेवक हे शिंदे गटात सामील होतील असं बोललं जातंय. 


अहमदनगर महापालिकेत शिवसेनेचा महापौर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकवेळी मदत केली आहे. त्यामुळे नगरच्या शिवसैनिकांशी शिंदे यांचे जवळचे संबंध आहेत. मात्र, अनेकांची इच्छा असून देखील ते उघडपणे शिंदे गटात सामील होत नव्हते, मात्र आता नगरसेवकांचा एक गट शिंदे गटात सामील झाला आहे.


नगरमध्ये सेनेचे निवडून आलेले 23 तर 2 स्विकृत असे, 25 नगरसेवक आहेत. एकनाथ शिंदेच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत फुट पडली. आधी आमदार, नंतर खासदार आणि आता नगरसेवक शिंदे गटात सामील आहेत. 


शिंदे गटात सामील होताच मिळाला निधी


शिवसेनेचे आजी- माजी नगरसेवक शिंदे गटात गेल्याबरोबर नगर शहरासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच कोटी रुपयांची भेट दिली आहे. नगरसेवकांच्या मागणीनुसार शहरातील पुतळांच्या सुशोभीकरणासाठी पाच कोटींचा निधी मुख्यमंत्री शिंदे यांनी मंजूर केला आहे.