Ahmednagar Rains : मोठ्या खंडानंतर अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात गणेश चतुर्थीपासून (Ganesh Chaturthi 2022) पावसाचे (Rain) जोरदार आगमन झालं आहे. जिल्ह्यात बाप्पांच्या आगमानाच्या दिवशी पावसाने जवळपास सर्वदूर हजेरी लावली. काही ठिकाणी तर विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी झाली. नेवासा बुद्रूक आणि श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान या महसूल मंडळात बुधवारी (31 ऑगस्ट) प्रत्येकी 158 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर उर्वरित तीन महसूल मंडळात 100 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. 


पावसाच्या आगमनाने खरीप पिकांना दिलासा
बराच काळ उघडीप दिल्यानंतर आलेल्या या पावसाने जिल्ह्यातील खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पेरण्या झाल्या आहेत. मात्र, जिल्ह्यातील मागील महिनाभरापासून पावसाने उघडीप दिली होती. गेल्या 15 दिवसांपासून तर जिल्ह्यात कडक उन्हामुळे पिके तहानली होती. या पिकांना पावसाची प्रतिक्षा होती. गणपती बाप्पांच्या आगमनाच्या दिवशी आलेल्या पावसाने या पिकांची तहान भागवली. तर काल (1 सप्टेंबर) दुपारपासूनही अहमदनगर शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. 


जिल्ह्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा
अहमदनगर जिल्ह्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ज्या ठिकाणी पाणी साचते अशा नागरिकांनी तसेच नदीकाठच्या नागरिकांनी वेळीच तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतर करण्याच्या सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी निर्मळ यांनी दिल्या आहेत.


जिल्ह्यात आतापर्यंत 76 टक्क्यांच्या सरासरीने 427 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणातील पाण्याची पातळी चांगली आहे. बुधवारी सायंकाळनंतर जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला आहे.


1 जून ते 31 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात 18 टक्के अधिक
महाराष्ट्रात 1 जून ते 31 ऑगस्टपर्यंत 18 टक्के अधिक पाऊस झाला आहे. 31 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात 814 मिमी पाऊस होत असतो, मात्र प्रत्यक्षात 957 मिमी पाऊस झाला. सांगली जिल्हा वगळता संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला असून सांगलीत सरासरीच्या 21 टक्के कमी पावसाची नोंद झाली. तर सर्वाधिक पाऊस नाशिक आणि वर्धा जिल्ह्यात झाला. इथे सरासरीच्या 53 टक्के अधिक पाऊस कोसळला. त्यानंतर नांदेडमध्ये सरासरीच्या 50 टक्के अधिक पाऊस तर नागपुरात सरासरीच्या 47 टक्के अधिक पावसाची नोंद झाली. पूर्व विदर्भात सरासरीच्या अधिक पाऊस झाला असून गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपुरात सरासरीच्या 30 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. यंदा कोकण आणि मराठवाड्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. मुंबई शहरात सरासरीच्या 15 टक्के कमी पाऊस झाला असला तरीही समाधानकारक पावसाची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय पुणे आणि पालघर जिल्ह्यात सरासरीच्या 30 टक्के अधिक पाऊस बरसला आहे.