Ahmednagar News : अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा. 17412 चौ. किमी असलेला हा जिल्हा तसा दोन भागात विभागाला आहे. उत्तर नगर जिल्हा आणि दक्षिण नगर जिल्हा. जसं अहमदनगरच्या नामांतरावरुन (Ahmednagar Name Change) मागच्या वर्षांपासून राजकारण रंगत आहे, तसंच ते जिल्हा विभाजनावरुन (Division) देखील रंगत आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी विधिमंडळात अहमदनगरच्या नामांतराचा तारांकित प्रश्न उपस्थित केला आणि अहमदनगरचे राजकारण तापलं. मात्र, यावरुन अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यातच नामांतराआधी जिल्ह्याचं विभाजन करा म्हणजे उत्तर नगर जिल्ह्याप्रमाणेच दक्षिण नगर जिल्ह्याचाही विकास होईल असा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी उपस्थित केला आहे. 


अहमदनगर जिल्हा विभाजनाचा मुद्दा हा काही आताच आलेला नाही तर हा जुनाच मुद्दा आहे त्यावर चर्चा नव्याने होऊ लागली आहे.


अहमदनगरच्या विभाजनाला खासदार सुजय विखे पाटील यांचा विरोध


तर जिल्हा विभाजनाच्या मुद्द्यावर भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी विरोध दर्शवला आहे. जिल्हा विभाजन केल्याने दक्षिण नगर जिल्ह्याला नेमका काय फायदा होईल याबाबत आधी मागणी करणाऱ्यांनी सांगावं, कोणताही विकासाचा आराखडा नसताना अशी मागणी करणं चुकीचं आहे असं मतं खासदार विखे पाटील यांनी मांडले.


विभाजन करुन जिल्ह्यांना सावित्रीबाई आणि अहिल्याबाई यांची नावं द्यावी : सचिन खरात


खरं आधीपासूनच अहमदनगरच राजकारण हे राज्याच्या केंद्रस्थानी राहिलं आहे. मात्र, यात नगर दक्षिण आणि नगर उत्तरचा विचार केला तर उत्तर नगर जिल्ह्यात राजकीय नेत्यांची संख्या आणि प्रभाव अधिक आहे. दक्षिणेकडील नेत्यांना आपलं नेतृत्व गुण दाखवण्याची फारशी संधी काही मिळाली नाही. त्यातच निधी वाटपावरुनही अनेकदा दक्षिण आणि उत्तरेकडील नेत्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. यात प्रश्नी जशी स्थानिक नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत तशाच जिल्ह्याबाहेरील नेत्यांच्याही प्रतिक्रिया येत आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करुन उत्तर अहमदनगरला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात यावं तसंच दक्षिण अहमदनगरला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात यावं अशी मागणी केली आहे.


औरंगाबाद-नगर-पुणे ग्रीनफिल्ड महामार्गामुळे दक्षिण नगरचा विकास?


अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन झाले तर उत्तर नगर जिल्ह्याचे मुख्यालय कोणते असावे यावरुन जसे मतभेद आहेत तसं दक्षिण नगर जिल्ह्यात विभाजन झाले तर शिर्डी, शनिशिंगणापूर हे आपल्या जिल्ह्यात राहणार नाही हा अस्मितेचा प्रश्न उपस्थित होतो. मात्र सध्या होऊ घातलेल्या औरंगाबाद-नगर-पुणे ग्रीनफिल्ड महामार्गामुळे पुणे आणि नगरचे अंतर कमी होणार असल्याने भविष्यात दक्षिण नगर जिल्हा हा पुण्याचे उपनगर म्हणून विकसित होऊ शकतो.


जशी अहमदनगरच्या नामांतरावरुन अनेकांची अनेक मतं आहेत तशी ती विभाजनाबाबतही आहे. त्यामुळे आता दोन्ही मुद्द्यांवर नेमका काय निर्णय होईल हे येत्या काळात पाहावं लागेल. मात्र हे मुद्दे पुन्हा पुन्हा समोर आणून राजकीय नेते चर्चेचं गुऱ्हाळ तेवढं सुरु ठेवतात हे नक्की.


संबंधित बातमी


Ahmednagar News : अहमदनगर नामांतराच्या प्रस्तावाबाबत ठराव मांडा, सरकारचं महापालिकेला पत्र