Ahmednagar News : अहमदनगरच्या नामांतराचा (Rename Ahmednagar as Punyashlok Ahilyadevi Nagar) मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. शिंदे-भाजप सरकारकडून अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याच्या नामांतराच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सरकारने महापालिकेला पत्र पाठवून महासभेत नामांतराचा प्रस्ताव घेऊन बहुमताचा ठराव पाठवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातून कोणाचीही मागणी नसताना सरकारच्या या भूमिकेमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


पडळकरांची लक्षवेधी, केसरकरांचं उत्तर


भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी विधिमंडळात याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून 'पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर' अशी लक्षवेधी आमदार गोपीचंद पडळकरांनी विधानपरिषदेत मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी नामांतराबाबत सरकार सकारात्मक असल्याचे उत्तर दिलं होतं. याबाबत महापालिका, तहसीलदार, पोस्ट ऑफिस, रेल्वे विभाग प्रमुख यांच्याकडून सविस्तर प्रस्ताव मागवला असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. सर्व माहिती आल्यानंतर हा प्रस्त केंद्र सरकारकडे पाठवून सकारात्मक निर्णय घेणार असल्याचं केसरकर यांनी सांगितलं. 


महापालिकेचा गोंधळ, नगरसेवक कसा प्रतिसाद देणार?


दरम्यान अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा प्रस्ताव महापालिकेकडून मागवण्यात आल्याने महापालिका गोंधळून गेली आहे. महापालिका अधिनियमात असा कोणताही ठराव करण्याची तरतूद नाही. तसंच नगर जिल्हाचं नाव बदलणं हे महापालिकेच्या अखत्यारित येत नसतानाही सरकारने ठराव मागितला आहे. त्यामुळे याबाबत काय निर्णय घ्यावा या पेचात महापालिका प्रशासन सापडलं आहे. नामांतराबाबत महासभा घेऊन ठराव पाठवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यानुसार महापालिका प्रशासनाने नामांतराचा विषय महासभेत ठेवण्याची भूमिका घेतली आहे. नगर महापालिकेत ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे नामांतराच्या ठरावाला नगरसेवक कसा प्रतिसाद देतात मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


अंबिकानगर नावाचीही मागणी


अहमदनगर शहराची स्थापना 28 मे 1490 रोजी मलिक अहमद बादशहाने केली. नुकतीच अहमदनगर शहराच्या स्थापनेला 533 वर्ष पूर्ण झाली आहे. मलिक अहमद निजामशहाच्या नावावरुनच अहमदनगर हे नाव पडले आहे.  अहमदनगरचे नाव राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरुन करण्याची मागणी केली असली तरी यापूर्वीच शिवसेनेकडून अहमदनगरचं नाव 'अंबिकानगर' करावी अशी मागणी झाली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 1995 साली वाडिया पार्क इथे झालेल्या सभेत त्यांनी अहमदनगरचं नाव आजपासून 'अंबिकानगर' झालं असं जाहीर केलं होतं. तेव्हापासूनच शिवसेनेने ही मागणी लावून धरली होती. 


संबंधित बातमी


 Ahmednagar : नाव बदलण्याची मागणी होत असलेल्या अहमदनगरचा इतिहास काय आहे? जाणून घ्या...