Ahmednagar News : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी जलसंधारण, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनासोबतच आता नागरिकांच्या सुदृढ जीवनासाठी राळेगणसिद्धीत (Ralegan Siddhi) एक नवा प्रकल्प सुरु केला आहे. तो म्हणजे लाकडी घाण्यातून विविध प्रकारच्या तेल निर्मितीचा...विशेष म्हणजे ना नफा ना तोटा या तत्वावर अण्णा हे तेल नागरिकांना देतात.
तेल निर्मिती प्रकल्प सुरु करण्याचं कारण काय?
सध्या खाद्य तेलामध्ये सुरु असलेल्या भेसळीमुळे अनेक आजार बळावले आहेत. त्यातल्या त्यात अतिशय तरुण युवकांनाही हृदयविकाराचे झटका येऊन त्यात त्यांना जीव गमवावा लागत आहेत. इतरही खाद्य पदार्थांमध्ये भेसळ होत आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीत लाकडी घाण्यावर तेल निर्मिती प्रकल्प सुरु केला आहे. सध्या इथे सूर्यफूल, करडई, शेंगदाणे आणि नारळाचे तेल काढले जात आहे, भविष्यात 70 प्रकारच्या वेगवेगळ्या पदार्थांपासून तेल निर्मिती करण्याचा या अण्णांचा मानस आहे. तसेच मिरची पावडर, हळद पावडर, जिरे पावडर आणि विविध प्रकारचे मसाले देखील या प्रकल्पात तयार होणार आहेत. या प्रकल्पाला 24 लाख रुपयांचा खर्च आला आहे, तो अण्णानी त्यांना मिळालेल्या पुरस्काराच्या रक्कमेतून आणि पेन्शनमधून केला आह. हिंद सेवा ट्रस्टच्या माध्यमातून हा प्रकल्प चालवला जात आहे.
हिंद सेवा ट्रस्टच्या माध्यमातून प्रकल्प सुरु
सुरुवातीला हा प्रकल्प महिला बचत गटाच्या माध्यमातून चालवण्याचा अण्णांचा मानस होता. मात्र प्रकल्पासाठी येणारा खर्च मोठा असल्याने जर हा प्रकल्प दुर्दैवाने चालला नाही तर महिलांना एवढा मोठा तोटा सहन करणं शक्य होणार नाही, म्हणून अण्णांनी हिंद सेवा ट्रस्ट मार्फत हा प्रकल्प चालवण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पात सध्या दोन महिला, एक पुरुष काम करत आहेत. सकाळी नऊ वाजल्यापासून त्यांच्या कामाला सुरुवात होते. सुरुवातीला सूर्यफूल किंवा इतर पदार्थांची डाळ बनवली जाते, ती स्वच्छ करुन घेतली जाते त्यानंतर ती घाण्यात टाकून त्यापासून तेल काढले जाते. दोन ते तीन दिवस तेल निवळण्यासाठी ठेवले जाते. नंतर त्याची पॅकिंग करुन विक्रीसाठी शोरुममध्ये ठेवले जाते. हिंद सेवा ट्रस्टमार्फतच या तेलाची विक्री होती.
ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद
या प्रकल्पात सध्या दररोज आठ घाणे काढले जातात, शेंगदाण्याच्या एका घाण्यातून 7 ते 8 किलो तेल मिळतं, तर इतर पदार्थांपासून 5 ते 6 किलो तेल मिळत, असं येथील महिला कामगारांनी सांगितलं आहे. एका घाण्यात 15 किलो पदार्थ टाकावे लागतात. या प्रकल्पासाठी लातूर येथून सूर्यफूल आणण्यात आले आहे तर स्थानिक बाजारातून शेंगदाणे आणण्यात आले आहे. सध्या ना नफा ना तोटा या तत्वावर हे तेल विकलं जात आहे. शेंगदाणा तेल 280 रुपये, सूर्यफूल तेल 320 रुपये, करडई तेल 340रुपये, खोबरेल तेल 500 रुपये प्रति लिटर प्रमाणे विकले जात आहे. त्यामुळे ग्राहकांचाही उत्तम प्रतिसाद याला मिळत आहे.
म्हणून लाकडी घाण्यापासून तेल निर्मिती
लोखंडी घाण्यावर निघणाऱ्या तेलात जीवनसत्त्वे टिकत नाही त्यामुळे अण्णांनी हाती घेतलेल्या "ग्राम समृद्धी" अभियानात लाकडी घाण्यापासूनच तेल निर्मिती केली जाते. प्रत्येक गावात असे लाकडी घाणे सुरु व्हायला हवेत असं अण्णांचं म्हणणं आहे. भविष्यात याच प्रकल्पात शेतकऱ्यांचे धान्य स्वच्छ करुन देण्यासाठी यंत्रणा बसवली जाणार असल्याचेही अण्णांनी सांगितले. जर स्वच्छ आणि शुद्ध खाद्यपदार्थ खाण्यात आले तर गाव सुदृढ होईल आणि गाव सुदृढ झालं तर देश सुदृढ होईल असं अण्णांनी म्हटलं आहे.