Ahmednagar News : अहमदनगर जिल्हाच्या पारनेर तालुक्यातील निघोज येथील ग्रामस्थांना सध्या एका वेगळ्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. हिंदू धर्मात दशक्रिया विधी वेळी पिंडाला कावळा शिवणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. पण निघोज गावात पिंडाला कावळा शिवतच नाही आणि त्याला कारणीभूत आहे दशक्रिया विधी घाटाजवळ गावातून आणून टाकलेला कचरा (Garbage) आणि मासांचे तुकडे (Meat).


दशक्रिया विधी घाटाजवळ कचऱ्याचं साम्राज्य


पारनेर (Parner) तालुक्यातील निघोज इथे मागच्या काही दिवसांपासून पिंडाला कावळा (Crow) शिवतच नाही. दशक्रिया विधी घाटापासून हाकेच्या अंतरावर असलेला कचरा त्याला कारण ठरतं आहे. गावातील ओला-सुका कचरा आणि चिकन-मटण दुकानातील वेस्टज इथे आणून टाकल्याने कावळे त्यावरच ताव मारत आहेत. परिणामी दशक्रिया विधी वेळी ठेवलेल्या भाताकडे कावळ्यांनी पाठ फिरवली आहे. या कचऱ्यामुळे इथल्या नागरिकांच्या आरोग्याचा तर प्रश्न निर्माण झालाच आहे. पण दशक्रिया विधी वेळी पिंडाला कावळा शिवत नसल्याने नागरिकांच्या भावनेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.


"निघोज गावाची लोकसंख्या 20 हजार आहे. गावातील सगळा कचरा हा स्मशानभूमीच्या अंत्यविधीच्या ठिकाणी टाकला जातो. ज्या विहिरीतून आम्हाला पाणी मिळतं ते याच नदीचं पाणी असतं. आरोग्याची परिस्थिती अतिशय अवघड आहे. दशक्रिया विधीला कावळा पिंडाला न शिवण्याचं कारण म्हणजे इथेच कचरा, चिकन-मटणचे दुकानातील वेस्टेज टाकलं जातं. त्यामुळे कावळे इथे येतात. नॉनव्हेज खाल्लं असल्यामुळे इथून हाकेच्या अंतरावर असलेल्या दशक्रिया विधी घाटावर कावळे भात खायला येत नाही," असं सामाजिक कार्यकर्ते रुपेश ढवण यांनी म्हटलं.


दशक्रिया विधीसाठी आलेले नातेवाईक तासनतास ताटकळत


निघोज ग्रामपंचायतीने या परिसरात कोट्यवधी रुपये खर्च करुन कचरा प्रकल्प सुरु तर केला पण तो लाल फितीच्या कारभारात अडकून पडला आहे. त्यामुळे इथल्या कचऱ्यावर प्रक्रिया होत नाही. इथला कचरा अक्षरशः पेटवून दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच मासांचे तुकडे आणून टाकल्याने कावळ्यांना नॉनव्हेज खायला मिळत असल्याने दशक्रिया विधीत भात खायला ते तयार नाहीत. परिणामी दशक्रिया विधीसाठी आलेल्या नातेवाईकांना तासनतास ताटकळत बसावं लागतं आणि पिंडाला कावळा शिवाला नाही तर त्या कुटुंबातील नातेवाईकांना रुखरुख लागून राहते.


"हा संपूर्ण गावाचा प्रश्न आहे. दहापैकी एक किंवा दोन पिंडालाच कावळा शिवतो.  दोन तास वाट पाहूनही कावळा पिंडाला शिवला नाही. लोक कंटाळून गेले. कावळा शिवला नाही तर लोकांच्या मनात रुखरुख लागून राहते. मग नाशिक किंवा आळंदीला जाऊन दशक्रियाविधी पूर्ण करावी लागते," अशी प्रतिक्रिया उत्तम लामखडे या गावकऱ्याने दिली.


कचरा समस्येवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी


दरम्यान याबाबत आम्ही ग्रामपंचायतीची भूमिका जाणून घेण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय गाठलं तर तिथे कुणीही उपलब्ध झाले नाही. मात्र या कचरा समस्येवर ग्रामपंचायत प्रशासनाने ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे अशीच भावना इथल्या ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.