Ahmednagar Name changing Issue :  औरंगाबाद नामांतराच्या वादानंतर आता अहमदनगरच्या नामांतराची मागणी पुढे आली आहे. अहमदनगरचं (Ahmednagar) नाव अहिल्यानगर (Ahilyanagar) करा, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे. अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करण्याच्या मागणीचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी स्वागत केलं आहे. मात्र नामांतरासोबतच त्या शहराच्या विकासावर बोलणं देखील गरजेचं आहे, असं सांगत त्यांनी गोपीचंद पडळकर यांना टोलाही लगावला आहे. नामांतराची मागणी करताना तिथल्या लोकांना विश्वासात घेणं गरजेचं असल्याचं रोहित पवार म्हणाले.


आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) पत्र लिहून अहमदनगरचं नामांतर करण्याचं आवाहन केलं आहे. पडळकर यांनी पत्रातून शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे तर नामांतरासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांना केलं आहे.


थोर व्यक्तींनी सांगितलेला मार्ग आत्मसात करुन काम करणं महत्त्वाचं : रोहित पवार
यावर नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहेत. ते म्हणाले की, "कुठल्याही शहराचं, भागाचं, जिल्ह्याचं, राज्याचं नाव जर बदलण्यासाठी थोर व्यक्तीचं नाव समोर येत असेल तर त्याचं स्वागत करण्यासारखंच आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासाठी पुढाकार घेत असतील तर चांगली गोष्ट आहे. पण हे करत असताना तिथल्या लोकांना विश्वासात घेणं महत्त्वाचं आहे. सामान्य लोकांना विश्वासात घेऊन जो निर्णय घेतील त्याचं सर्वांनी स्वागत केलं पाहिजे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्याला काय विचार दिले की, सामान्य लोकांच्या हितासाठी काम केलं पाहिजे. चांगेल रस्ते असावेत, पिण्याचं पाणी चांगलं असावं, धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. हे विचार स्वीकारुन त्यांनी दिलेला मार्ग असो किंवा इतर थोर व्यक्तींनी दिलेला मार्ग आत्मसात करुन काम करणं हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे."


'अहमदनगर' नाव बदलून 'अहिल्यानगर' करण्यात यावे
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गोपीचंड पडळकर यांनी म्हटलं आहे की, "हिंदूराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे संपूर्ण हिंदूस्थानाच्या प्रेरणास्थान आहेत. जेव्हा हिंदूस्थान मुसलमानी राजवटीत हिंदूसंस्कृती, मंदिरं लुटली आणि तोडली जात होती, त्यावेळेस अहिल्यामातेनं या हिंदू संस्कृतीत प्राण फुकले, त्यांचा जीर्णोद्धार केला. हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला, त्या जिल्ह्याचे 'अहमदनगर' नाव बदलून 'अहिल्यानगर' करण्यात यावे अशी तमाम अहिल्याप्रेमींची लोकभावना आहे."