अहमदनगर : 'आजपर्यंत मराठा समाजाने खूप त्रास सहन केला असून आता बदल घडवायचा आहे. आरक्षण मिळविण्यासाठी लढा द्यायचा आहे. त्यासाठी सरकारला एक महिन्याचा वेळ दिला आहे. त्यानुसार येत्या 24 तारखेपर्यंत सरकारकडे वेळ असून त्यानंतरचे आंदोलन झेपणार नाही आणि पेलणारही नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. तसेच, मराठा समाजास (Maratha Reservation) आरक्षण देताना कोणी आडवा आला तर त्याला टप्प्यात घेतलाच म्हणून समजा', अशी समजही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिली. 


गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचं वारं राज्यभर घुमत असून एकट्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अख्खा महाराष्ट्र एका छताखाली आणण्याचं काम केलं आहे. जरांगे यांच्या सभांना ताबडतोड अशी गर्दी पाहायला मिळत असून प्रत्येकवेळी सभांमध्ये लाखोंच्या संख्येने आलेल्या मराठा समाज बांधवांमध्ये हुंकार भरण्याचे काम मनोज जरांगे पाटील करत आहे. सध्या त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरु असून काल उशिरा ते अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील कर्जतमध्ये दाखल झाले, त्यानंतर याच ठिकाणी त्यांनी विचारात सभा घेतली. यावेळी ते बोलत होते. जरांगे पाटील म्हणाले की, 'सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला. आम्ही 40 दिवस दिले. 24 तारखेपर्यंत सरकारकडे वेळ आहे. आरक्षण मिळाले नाही तर त्यानंतरचे आंदोलन झेपणार नाही आणि पेलणारही नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.


कर्जत (Karjat) येथे शनिवारी सायंकाळी सकल मराठा समाज आयोजित महासभेत ते बोलत होते. यावेळी कर्जतमध्ये जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, 'मराठा जातीच्या वेदना पोटतिडकीने मांडतोय, मात्र सद्यस्थितीत सध्या चारही मराठा समाजाला घेरले आहे, तरीही आपण एकत्र आलो आहोत. सरकारला आरक्षण द्यावेच लागणार आहे, मात्र आपण सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून समाजासाठी एक होण्याची गरज आहे. आपल्यासाठी नव्हे, पण पुढील पिढ्यांसाठी आरक्षण गरजेचे आहे. म्हणून आपल्याला लढावच लागेल. यासाठी घरघर पिंजून काढा, समाजाशी संवाद साधा, तळागाळात जाऊन भेटीगाठी घ्या, आरक्षण लोकांना समजून सांगा, आरक्षण का गरजेचे आहे हे समाजाला पटवून सांगा, असे आवाहन म्हणून जरांगे पाटील यांनी केले.


...तर टप्प्यात घेतलाच म्हणून समजा : मनोज जरांगे 


आरक्षण मिळवण्यासाठी (Maratha Reservation) फक्त एकजूट वाढवा आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार घ्यायची नाही, मी माघार घेणार नाही, तुम्ही पण मागे हटायच नाही. पण ते आरक्षण शांतता पाळून घ्यायचे आहे, त्यासाठी कोणी जीव देऊ नका, आपले कुटुंब उघड्यावर टाकू नका, असे देखील यावेळी मनोज जरांगे यांनी समाज बांधवांना सांगितले. मराठा समाजास आरक्षण देताना कोणी आडवा आला तर त्याला टप्प्यात घेतलाच म्हणून समजा, याच जातीने अनेक राजकीय नेत्यांना मोठं केलं, मात्र आज तेच नेते आमच्या विरोधात उभे राहिले आहेत, अशी खंत मनोज जरांगे यांनी बोलून दाखवली. जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी भव्य हार क्रेनच्या साह्याने कर्जतच्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज चौकात उभारला होता. यासह सात जेसीबीतून फुलांचा वर्षाव करण्यासाठी योग युवक उभे होते मात्र जरांगे पाटील यांनी फुले न टाकण्याची विनंती केली. साधेपणाने सभास्थळी जाणे पसंत केले. त्याचबरोबर अशा पद्धतीने स्वागत करू नका, आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी हा पैसा जपून ठेवा, असं आवाहन देखील यावेळी जरांगे पाटील यांनी केलं.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


एकीकडे सभांचा धडाका, दुसरीकडे सरकारला गंभीर इशारा; रात्री 12 वाजताही मनोज जरांगेंच्या सभेसाठी बीडमध्ये तुफान गर्दी