अहमदनगर: कर्जत तालुक्यातील दूरगाव येथून लव्ह जिहादचा प्रकार घडल्याची चर्चा आहे. दूरगाव येथील शिंदे वस्ती येथे राहणाऱ्या एका कुटुंबातील अल्पवयीन मुलीचे लव्ह जिहादसाठी अपहरण झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला. त्यानंतर अहमदनगरच राजकारण चांगलंच तापले आहे.


कर्जत तालुक्यातील दूरगाव येथील हे कुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलं होतं. या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीचे 22 मे रोजी अपहरण झाले. गावातील आजीम शेख याने लव्ह जिहादसाठी आपल्या मुलीचे अपहरण केल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे. सोबतच पोलिसांनी वेळेत दखल न घेतल्यानेच आपल्यावर उपोषण करण्याची वेळ आल्याचे पीडित मुलीच्या वडिलांचे म्हणणे आहे.


विशेष म्हणजे गेल्यावर्षी देखील संबंधित मुस्लिम युवकाने आपल्या मुलीला पळून नेण्याचा प्रयत्न केल्याचे पीडित मुलीच्या आईचे म्हणणे आहे. त्यावेळी मुलीच्या मामाला मारहाण करून मुलीला पळून घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळीही पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यानंतर आपली दखल घेतली गेली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.


22 मे रोजी मुलगी घरात नसल्याने शोधाशोध करूनही मुलगी मिळून आली नाही. त्यानंतर 23 तारखेला पोलिसात तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांनी दखल घेतली नाही असा आरोप नातेवाईकांनी केला. अपहरणाचा गुन्हा दाखल न करता मुलगी हरवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातच अद्याप मुलगी मिळून न आल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अहमदनगर जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी या कुटुंबियांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. शिवसेना, ठाकरे गट, भाजपच्या नेत्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. 


भाजपचे माजी राज्यसभा खासदार अमर साबळे आणि राम शिंदे यांनी देखील कुटुंबीयांची भेट घेतली. तर ठाकरे गट आणि हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. दरम्यान भाजप नेते जेव्हा या पीडित कुटुंबाची भेट घेत होते त्यावेळी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी येत राजकीय घोषणाबाजी देखील केली. त्यामुळे भेट घेणारे राजकीय नेते किती संवेदनशील आहेत हाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला. दरम्यान दिवसभर सुरू असलेल्या आंदोलनामुळे शहरातील वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. वाढता दबाव लक्षात घेता पोलिसांनीही तीन पथक मुलीच्या शोधासाठी पाठवले असल्याचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले आहे.


दरम्यान पोलिसांच्या आश्वासनानंतर आणि भेटण्यासाठी आलेल्या नेत्यांनी दिलेल्या शब्दांनंतर या कुटुंबाने आपले उपोषण मागे घेतले आहे.  उपोषणकर्त्या कुटुंबियांना औषध उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलिसांच्या आश्वासनानंतर जरी आपण उपोषण मागे घेतले असले तरी आपला पोलिसांवर विश्वास नसल्याचे मुलीच्या आईचे म्हणणे आहे. या कुटुंबियांच्या भेटीसाठी पुढील आठवड्यात भाजप नेते किरीट सोमय्या देखील कर्जत येथे येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र वारंवार होणाऱ्या अशा घटना विचार करायला लावणाऱ्या आहे.


ही बातमी वाचा: