Ahmednagar News:  अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातर्फे 2023-24 या शैक्षणिक वर्षाची सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र या यादीत 29 तारखेला साजरा होणाऱ्या बकरी ईदचा (Eid) उल्लेख करण्यात आला, परंतु देशभरात साजरा होणाऱ्या आषाढी एकादशीचा (Ashadhi Ekadashi) उल्लेख केलेला नाही. त्यामुळे 'अहमदनगरचा शिक्षण विभाग पाकिस्तानात आहे का?' असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. दरम्यान यंदा आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी म्हणजे 29 जून रोजी आहे. 


परंतु या प्रकरणावर मनसेने कोणत्याही प्रकाराचा राडा न करता यावर गांधीगिरीचा मार्ग अवलंबला आहे. मनसेकडून जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदनासह पांडुरंगाची प्रतिमा भेट देण्यात आली आहे. तर या संदर्भात उपशिक्षणाधिकारी कार्ले यांनी कॅमेरा समोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे यावर शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण येणे तितकेच महत्त्वाचे असल्याचं म्हटलं जात आहे. 


दरम्यान मनसेकडून शासनाच्या वतीने शैक्षणिक वर्षात देण्यात येणाऱ्या सुट्टय़ांच्या यादीत आषाढी एकादशीचा उल्लेख करावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे. तसेच  शासनाने काढलेल्या गॅजेटमध्ये देखील आषाढी एकादशीचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे मनसे पदाधिकाऱ्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. तर  लवकरात लवकर सुट्यांच्या यादीत आषाढी एकादशीच्या सुट्टीचा उल्लेख करावा अन्यथा मनसे स्टाईलने शिक्षण विभागाला जागं करु असा इशारा देखील मनसेने यावेळी शिक्षण विभागाला दिला आहे. तसेच हिंदू सणांचा उल्लेख न करण्यामागे शिक्षण विभागाचा नेमका हेतू काय असा सवाल देखील मनसेने यावेळी उपस्थित केले आहे. 


यंदा 29 जून रोजी आषाढी एकादशी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात या सोहळ्याचे विशेष महत्त्व आहे. लाखो वारकरी सध्या पंढपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे. संपूर्ण विठुरायाची पंढरी वैष्णवाच्या मेळाने भरुन गेले आहे. त्यामुळे या सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र उत्सुक आहे. त्यामुळे या आषाढीच्या सुट्टीचा उल्लेखच डावलण्यात आल्याने मनसेने यावर अनेक सवाल उपस्थित केले आहेत. तर यावर आता शिक्षण मंडळ काय स्पष्टीकरण देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यंदा बकरी ईद आणि आषाढी एकादशी एकाच दिवशी आल्याने मुस्लिम समाजाकडून देखील आषाढीच्या दिवशी कुर्बान न देण्याचा निर्णय घेतला आहे. पण अहमदनगमधील या मुद्द्यामुळे आता कोणत्या नव्या वादाला तर तोंड फुटणार नाही ना हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Ashadhi Wari 2023 : यंदा आषाढी यात्रा होणार आरोग्य वारी! लाखो वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी, शिंदे फडणवीस सरकारची अनोखी भेट